आयपीएल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने इंग्लिश कौंटी स्पर्धेतील वीस खेळाडू व दोन पंचांची भ्रष्टाचारविरोधी सदस्यांमार्फत चौकशी करण्याचे ठरविले आहे.
बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळलेल्या खेळाडूंचीही चौकशी होणार आहे. रवी बोपारा, ओवेस शहा, कबीर अली, फिल मुस्टाड, दिमित्री मस्कॅरिन्हास आदी खेळाडूंची चौकशी केली जाणार आहे.
इंग्लिश व वेल्स क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार विरोधी समितीमार्फत या खेळांडूंची चौकशी होईल असे वृत्त येथील डेली टेलिग्राफने दिले आहे.
खेळाडूंबरोबरच जेरेमी लॉईड्स व रिचर्ड इलिंगवर्थ या पंचांनाही चौकशी समितीपुढे उभे केले जाणार आहे. या दोन्ही पंचांनी बांगला लीगमध्ये पंच म्हणून काम केले होते.
या स्पर्धेच्या वेळी भ्रष्टाचारविरोधी समितीचे सदस्य उपस्थित असल्याचे सांगितले जाते. स्पर्धेचा विजेता संघ ढाका ग्लेडिएटर्स व चित्तगाव किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात स्पॉटफिक्सिंग झाल्याचा संशय आहे. त्याखेरीज ढाका ग्लेडिएटर्स व बारिसाल बर्नर्स या सामन्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

Story img Loader