महिला विश्वचषक स्पर्धेनंतर नुकतीच आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जारी केली. यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राज, हरपनप्रीत कौर आणि झुलन गोस्वामीसह दीप्ती शर्माने अव्वल दहांमध्ये स्थान मिळवले. भारतीय संघाला दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाणारी मिताली राज एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर विश्वचषकात आक्रमक फटकेबाजी करणारी हरमनप्रीत कौर सातव्या स्थानावर आहे. या दोघींशिवाय भारतीय संघातील गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामीने देखील अव्वल दहा महिला गोलंदामध्ये स्थान मिळवलंय.

https://www.instagram.com/p/BX4JGyBDYAW/

आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत झुलन दुसऱ्या स्थानावर आहे. तर अव्वल दहा अष्टपैलू महिलांमध्ये दीप्ती शर्मा सातव्या स्थानावर आहे. विश्वचषकात दमदार खेळी करुन क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारतीय संघातील पूनम राऊतला अव्वल दहामध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. ती या यादीत १४ व्या स्थानावर आहे. आयसीसीने जारी केलेल्या महिला एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजीत ऑस्ट्रेलियन मॅग लॅनिंग अव्वल असून, गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मॅरिजेन कपने छाप पाडली. सांघिक क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया १२७ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर विश्वविजेतेपद पटकविणाऱ्या इंग्लंडच्या महिला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत १२५ गुणांसह दुसऱ्या, न्यूझीलंडच्या महिला ११८ गुणांसह तिसऱ्या, तर भारतीय महिला ११४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.

Story img Loader