महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघ आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय महिला संघ वेस्ट इंडिजशी दोन हात करणार आहे. परंतु या सामन्याच्या आधी जागतिक क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. स्पॉट फिक्सिंग हे या भूकंपाचं कारण आहे. नुकतीच एका बांगलादेशी क्रिकेटपटूने स्पॉट फिक्सिंगची तक्रार केली आहे. जमुना टीव्हीच्या रिपोर्टनुसार बांगलादेशी क्रिकेटपटू लता मंडल हिने दावा केला आहे की, शोहले अख्तरने तिला स्पॉट फिक्सिंग करण्याची ऑफर दिली होती. लताच्या या खळबळजनक आरोपामुळे जागतिक क्रिकेटला हादरा बसला आहे.
लताने दिलेल्या माहितीनुसार स्पॉट फिक्सिंगची ही घटना १४ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश या सामन्यानंतरची आहे. यावेळी लताला शोहले अख्तरने स्पॉट फिक्सिंगची ऑफर दिल्याचा दावा लताने केला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाची आता चौकशी करणार आहे.
आरोप करणारी खेळाडू प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हती!
लता मंडल ही बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात बांगलादेशच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हती. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ विकेट आणि १० चेंडू राखून जिंकला होता. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्सच्या बदल्यात १०७ धावा जमवल्या होत्या. बांगलादेशची कर्णधार निगार सुल्ताना हिने ५० चेंडूत ५७ धावा फटकावल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने १८.२ षटकात ८ विकेट राखून १०८ धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेग लेनिंगने नाबाद ४८ धावा फटकावल्या तर एलिसा हीलीने ३७ धावांची खेळी साकारली.
हे ही वाचा >> IND vs AUS : दुसऱ्या कसोटीआधीच स्टीव्ह स्मिथने टेकले गुडघे, कांगारूंना नेमकी कसली भीती?
आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
दरम्यान, आज या स्पर्धेत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना खेळवला जाणार आहे. भारताने आजचा सामना जिंकला तर ग्रुपमध्ये भारताचं टॉप २ मधलं स्थान भक्कम होईल. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर मात केली होती.