आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील भारतीय संघाचे आव्हान आज संपुष्टात आले. आजचा सामना दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळवला गेला. मात्र आफ्रिकेने तीन गडी राखून भारताचा पराभव केल्यामुळे भारत विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. भारताने आफ्रिकेसमोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करण्यास उतरला होता. भारताच्या सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी करत आफ्रिकेसमोर २७४ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये स्मृती मानधनाने दिमाखदार फलंदाजी करत ८४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७१ धावा केल्या. त्यानंतर मिताली राजनेही चांगला खेळ करत ८४ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या जोरावर ६८ धावा केल्या. तसेच शेफाली वर्मा (५३), हरमनप्रित कौर (४८) यांनी मोलाची कामगिरी करुन दक्षिण आफ्रिकेसमोर २७५ धावांचे आव्हान उभे केले.
तर दुसरीकडे २७५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाची सुरुवात थोडी खराब झाली. १४ धावांवर असताना आफ्रिकेने पहिला गडी गमावला. मात्र त्यानंतर लॉरा वोल्वार्ड (८०) आणि लारा गुडॉल (४९) यांनी संघाला सावरले. कर्णधार सुने लुस (२२), मिग्नॉन डू प्रिझ (५२), मारिझान कॅप (३२) यांनी आफ्रिकेचा विजय सुकर करण्यास मदत केली.
नो बॉलने केला घात
भारताने उभे केलेले २७४ धावांचे लक्ष्य गाठताना आफ्रिकेला चांगलीच कसरत करावी लागली. शेवटच्या षटकात २ चेंडूंमध्ये ३ धावा करायच्या होत्या. मात्र ऐन वेळी दिप्ती शर्माने नो बॉल टाकल्यामुळे सामना फिरला. नो बॉल असल्यामुळे झेल घेऊनही आफ्रिकेचा गडी बाद झाला नाही. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर आफ्रिकेने एक एक धाव करत विजय मिळवला. या पराभवासह आयसीसी विश्वचषकातील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.