एकदिवसीय महिला विश्वचषकासाठीच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केलीय. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानला तब्बल १०७ धावांच्या फरकाने पराभूत केलंय. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचं तगडं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानी संघाची चांगलीच दमछाक झाली. पाकिस्तानला अवघ्या १३७ धावा करता आल्या. भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरोधातील विजयाची मालिका सुरुच ठेवल्याने या धडाकेबाज कामगिरीचं कौतूक केलं जातंय.
भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचं आव्हान उभं केलं होतं. पाकिस्तान संघाने आव्हानाचा पाठलाग करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र या संघाला फक्त १३७ धावाच करता आल्या. ४३ षटकांमध्ये पाकिस्तानचा पूर्ण संघ बाद झाला. पाकच्या एकाही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. शिद्रा अमिनने ३० धावा केल्या. त्यानंतर एकाही खेळाडूने २४ पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. दहाव्या षटकात पाकचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर ७० धावांवर असतानाच पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
पाकिस्तानचा डाव १३७ धावांवर गुंडाळण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी मोठी कामगिरी केली. राजेश्वरी गायकवाडने चार फलंदाजांना बाद करुन भारताचा विजय पक्का केला. त्याखालोखाल झुलन गोस्वामी, स्नेह राणा, यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मेघना सिंघ आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
दुसरीकडे भारतीय फलंदाजांपेकी स्मृती मंधाना, पूजा वस्त्रकर, स्नेह राणा या खेळाडूंनी अर्धशतकी खेळ करत भारताचा धावफलक २४४ धावांवर नेऊन ठेवला. सुरुवातीला ११२ धावांमध्ये पाच फलंदाज तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ २०० धावातरी करु शकणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र पूजा वस्त्रकर आणि स्नेह राणा यांनी संघाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत धडाकेबाज फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी १२२ धावांची शतकी भागिदारी केल्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानपुढे २४४ धावांचा डोंगर उभा करु शकला.
स्मृतीने ७५ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. तर स्नेह राणाने ४८ चेंडूंमध्ये ४ चौकरांसह ५३ धावा केल्या. पूजा वस्त्रकरने ५९ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने तब्बल ६७ दावा केल्या. पाकिस्तानी गोलंदाजांना पूजा आणि स्नेह यांची जोडी तोडण्यात शेवटपर्यंत यश आले नाही. शेवटी ५० षटके संपल्यामुळे पूजा आणि स्नेह नाबाद राहिले.