आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी करत पाकिस्तानला धूळ चारली. आजचा हा सामना जय-पराजय यासोबतच आणखी एका गोष्टीमुळेदेखील चर्चेत राहिला. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारुफ आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन आली होती. बाळाला ड्रेसिंग रुममध्ये ठेवून मारुफने आजचा सामना खेळलाय. मारुफ आणि तिच्या बाळाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठऱत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्ताची कर्णधार बाळाला सोबत घेऊन आली

भारतीय संघाने पाकला १०७ धावांच्या फरकाने नमवत दणदणीत विजय मिळवला. भारताच्या स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकर या जोडगोळीने तर पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. या जोडीने शतकी भागिदारी करत पाकसमोर २४५ धावांचे आव्हान उभे केले. पाक या सामान्यात पराभूत झाला. मात्र पाकची कर्णधार बिस्माह मारुफची आज चांगलीच चर्चा झाली. कारण बिस्मा आज तिच्या बाळाला सोबत घेऊन आली होती. बिस्माह महिला क्रिकेटर असली तर ती एक आईदेखील आहे. बाळ छोटे असल्यामुळे बिस्माह त्याला सोबतच घेऊन आली होती. लाल ड्रेसमधील या गोड बाळाच्या सगळेच प्रेमात पडले होते.

भारतीय महिला संघाला बाळाची भुरळ

भारताविरोधात खेळण्यासाठी बिस्माहने आपल्यासोबत क्रिकेट कीट, सामानाने भरलेली बॅग सोबत आणली होती. मात्र सोबतच दुसऱ्या हातात बिस्माहने आपल्या बाळालाही घेतले होते. बिस्माहच्या या गोड बाळाची भूरळ भारतीय महिला क्रिकेट संघालादेखील पडली. भारतीय क्रिकेटर एकता बिष्टला मारुफच्या बाळाला पाहून चांगलाच आनंद झाला. एकीकडे सामना सुरु असताना बिष्ट मारुफच्या बाळासोबत खेळत होती. हे चित्र कॅमेऱ्यात टिपण्यात आले. त्याचबोरबर भारतीय महिला संघाने या बाळासोबत थेट फोटोशूटच केला. बिस्माह मारुफ, तिचे बाळ आणि भारतीय टीमचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

क्रिकेट म्हटलं की पराभव आणि विजय आलाच. माझ्याच देशाच्या विजय व्हावा, अशी इच्छा प्रत्येकाची असते. मात्र यापलीकडे मानवी भावना ओथंबून आल्याचे चित्र आजच्या सामन्यादरम्यान दिसले. प्रेमाला कोणत्याही देशाची सीमा रोखू शकत नाही हेच खरे. बिस्माह आणि तिचे बाळ मूळचे पाकिस्तानमधील असले तरी त्या बाळाला पाहून भारतातील क्रिकेटचे चाहते चांगलेच खूश झाले होते. आजच्या या सामन्यात भारत- पाकिस्तान हे दोन भिन्न देश असले तरी बिस्माहच्या गोड बाळाला पाहून सीमेची ही रेष आपसूकच मिटली. सोशल मीडियावर या बाळाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc womens world cup india vs pakistan india won match pakistan captain bismah maroof child photo went viral on social media prd