बे ओव्हल येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये एकदिवसीय महिला विश्वचषक सामना रंगतोय. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे आव्हान उभे केले आहे. २४४ धावांचा हा डोंगर उभारताना स्नेह राणा, पूजा वस्त्रकर या जोडीने दमदार कामगिरी केली. भारतीय संघ वाईट स्थितीत असताना या जोडीने सातव्या विकेटसाठी १२२ धावांची भागिदारी केली. ही धमाकेदार कामगिरी करताना या जोडीने नवा विक्रम केलाय.
३३ षटकांत भारताचे सहा गडी बाद
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. विश्वचषकातील हा पहिलाच सामना असल्यामुळे भारतीय महिला संघ फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करेल अशी सर्वांनाच आशा होती. मात्र अवघ्या ३३ षटकांत भारतीय संघाची १४४ धावांवर सहा गडी बाद अशी दयनीय स्थिती झाली. ही स्थिती पाहता भारतीय संघ २०० धावांपर्यंत जाणार का याबाबत साशंकता निर्माण झाली होती. सहा गडी बाद होईपर्यंत स्मृती मंधाना आणि दिप्ती शर्मा वगळता एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज धारातीर्थी पडले.
पूजा, स्नेहने रचला विक्रम
मात्र पूजा वस्त्रकर आणि स्नेह राणा या जोडीने भारतीय संघाला सावरलं. त्यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत ११२ धावा केल्या. या तगड्या धावसंख्येमुळे भारतीय संघाने २४४ धावांपर्यंत मजल मारली. पूजा वस्त्रकरने ५९ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. तर स्नेह राणाने ५९ चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या जोरावर भारतासाठी ५३ धावा केल्या. पुढे दोन्ही खेळाडूंनी मैदानावर पाय रोवल्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना ही जोडी तोडणे अवघड झाले. शेवटी ५० षटकांचा खेळ संपूनही या जोडीला तोडण्यात पाकिस्तानला यश आले नाही. परिणामी स्नेह आणि पूजा नाबाद राहिले. याबरोबरच या जोडगोळीने विश्वचषकात एक अनोखा विक्रम केला आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातव्या विकेटसाठी सर्वात जास्त धावांची भागेदारी करणाऱ्याचा मान पूजा आणि स्नेह या जोडीला मिळाला आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात या जोडीने हा विक्रम केलाय.
पाकिस्तानपुढे २४५ धावांचे आव्हान
दरम्यान, भारतीय संघने पाकिस्तानला २४५ धावांचे लक्ष्य दिले आहे. सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच षटकामध्ये सेफाली शर्मा तंबूत परतली. ती एकही धाव करु शकली नाही. त्यानंतर दिप्ती शर्मा आणि मंधाना यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी केली. नंतर २१ व्या षटकात पाकिस्तानी खेळाडू नर्शा संधूने दिप्ती शर्माला ४० धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर मात्र हरमनप्रीत कौर, रिचा घोष, मिताली राज या मैदानावर जास्त तग काळ धरू शकल्या नाहीत. कौरने ५, रिचा घोषने १ तर मितालीने अवघ्या ९ धावा केल्या. पुढे स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांनी मैदानवर पाय घट्ट रोवले. या जोडीने शतकी भागिदारी केल्यामुळे भारतीय संघ थोडासा सावरला. पूजाने ४८ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करुन भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. तर राणानेही ४६ चेंडूमध्ये अर्धशतक केले. राणाने ४८ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या तर पूजा मैदानात टीकून राहून ५९ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्या.