३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणारा विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. सध्या भारतीय संघातील खेळाडू आयपीएलच्या बाराव्या हंगामात व्यस्त आहेत. विराट कोहलीचा बंगळुरु संघ आयपीएलमधून बाहेर गेला असला तरीही रोहितचा मुंबई इंडियन्स संघ अजुनही बाद फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या पाठीशी उभं राहणं माझी जबाबदारी असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.

“उप-कर्णधार या नात्याने विराटच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला गरज असेल तेव्हा मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. गेली काही वर्ष आम्ही अशाच प्रकारे काम करतोय. ज्यावेळी धोनी संघाचा कर्णधार होता, त्यावेळी तो सचिन-सेहवाग यासारख्या सिनीअर खेळाडूंचा सल्ला घ्यायचा. आताच्या परिस्थितीमध्ये गरज असेल तेव्हा विराटची मदत हे आमचं काम आहे.” रोहित India Today वाहिनीशी बोलत होता.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघात हवाच – नासिर हुसेन

विश्वचषकासाठीच्या तयारीबद्दल विचारलं असता रोहित म्हणाला, कोणत्याही एका खेळाडूने संघ तयार होत नाही. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान हे महत्वाचं असतं. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं मत, सरावादरम्यान महत्वाचं असतं. विश्वचषकात भारताचा सलामीची सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Story img Loader