स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात बुधवारी पाकिस्तानने न्यूझीलंडचा सहा विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या या कामगिरीमुळे न्यूझीलंडच्या विश्वचषकातील विजयी अभियानाला ब्रेक लागला आहेच पण भारत आता स्पर्धेतील अपराजित संघ बनला आहे. दहा देशांच्या आयसीसी २०१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अजूनपर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

पाकिस्तानने काल न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले २३८ धावांचे लक्ष्य पार करुन गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघ सात गुणांसह पाचव्या स्थानी आहेत. न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या संघांविरुद्ध मोठे विजय मिळवले असून न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. या सामन्याचे भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळाले.

गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया १२ गुणांसह पहिल्या न्यूझीलंड ११ गुणांसह दुसऱ्या आणि भारत ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्यफेरीत पोहोचण्यासाठी चुरस चौथ्या स्थानासाठी आहे. इंग्लंड ८ गुणांसह सध्या चौथ्या स्थानावर आहे. स्पर्धेत इंग्लंडने चार सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभव झाला आहे.