अहमदाबाद : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज, शनिवारी ‘अ‍ॅशेस’ प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. इंग्लंडचा संघ साखळी फेरीतच गारद होणार हे जवळपास निश्चित असले, तरी या सामन्यात ऑस्ट्रेलियाला तगडे आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. हा सामना अहमदाबाद येथील सव्वालाख आसनक्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पूर्णपणे भिन्न राहिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या दोन लढती गमावल्यानंतर आपला खेळ उंचावला आणि पुढील चारही लढतींमध्ये विजय मिळवला. दुसरीकडे गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला यंदाच्या स्पर्धेत लयच सापडलेली नाही. सहापैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागलेला इंग्लंडचा संघ गुणतालिकेत तळाला म्हणजेच १०व्या स्थानी आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करणार नाही.

हेही वाचा >>> NED vs AFG, World Cup 2023: अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा ७ गडी राखून उडवला धुव्वा, गुणतालिकेत पाकिस्तानला टाकले मागे

ऑस्ट्रेलियाला या सामन्यात मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन प्रमुख अष्टपैलूंविनाच खेळावे लागणार आहे. मार्शने आघाडीच्या फळीत खेळताना काही चांगल्या खेळी केल्या आहेत, तर मॅक्सवेलने दोन सामन्यांपूर्वी नेदरलँड्सविरुद्ध ४० चेंडूंतच विक्रमी शतक साकारले होते. त्यामुळे या दोघांची उणीव ऑस्ट्रेलियाला जाणवेल.

ऑस्ट्रेलिया

’ ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने कॅमरुन ग्रीन आणि मार्कस स्टोइनिस यांना संधी मिळणे अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियाला केवळ १३ खेळाडूंमधून आपला संघ निवडावा लागेल.

’अहमदाबाद येथील खेळपट्टीवर फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता असून लेग-स्पिनर अ‍ॅडम झ्ॉम्पाची भूमिका निर्णायक ठरेल. झॅम्पाने गेल्या चार सामन्यांत मिळून १५ बळी मिळवले आहेत.

’गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने पुनरागमनात शतक केले होते. त्याच्यासह डेव्हिड वॉर्नर चांगल्या लयीत आहे. गोलंदाजीत कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल.

इंग्लंड

’ इंग्लंडने यंदाच्या स्पर्धेची सुरुवात अहमदाबाद येथूनच केली होती. त्या सामन्यात इंग्लंडला न्यूझीलंडने पराभूत केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दर्जेदार कामगिरीचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.

’इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, रुट, मोईन अली हे सर्वच तारांकित खेळाडू अपयशी ठरले आहेत.

’गेल्या सामन्यात भारताविरुद्ध ख्रिस वोक्स, डेव्हिड विली आणि आदिल रशीद यांनी प्रभावी मारा केला होता. ते कामगिरीत सातत्य राखतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विली या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

’ वेळ : दुपारी २ वा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc world cup 2023 australia vs england match preview zws
Show comments