नवी दिल्ली : पहिल्या सामन्यात कठीण परिस्थितीतून लढत जिंकणारा भारतीय संघ बुधवारी विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करेल. वेगवेगळय़ा परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेण्याचे आव्हान भारतासमोर असेल, असे कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते. चेपॉकच्या धिम्या व फिरकीला अनुकूल अशा खेळपट्टीनंतर आता भारतीय संघ फिरोजशाह कोटलावर खेळणार आहे. या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिका व श्रीलंका दरम्यान गेल्या आठवडय़ात झालेल्या सामन्यात ७००हून अधिक धावा झाल्या होत्या.
शुभमन गिल आजारी असल्याने हा सामना खेळणार नाही. त्यामुळे इशान किशनला पुन्हा एकदा रोहितसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किशन व श्रेयस अय्यर खराब फटका मारून बाद झाला होता. त्यामुळे भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात या दोन्ही फलंदाजांना ही चूक सुधारावी लागेल. गिल तीन दिवसांनंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तंदुरुस्त झाला नाही. तर, इशानला या सामन्यातही डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. अफगाणिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणाचा सामना करणे भारतासाठी कठीण नसेल. मैदान छोटे असल्याने मोठय़ा फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळू शकते. विश्वचषकापूर्वी खेळपट्टी पुन्हा तयार करण्यात आल्याने त्यामध्ये बदल पाहायला मिळत आहे.
हा सामना विराटच्या शहरामध्ये होत आहे आणि चेन्नई येथील लय कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे कोहलीचा खेळ पाहण्यासाठी चाहतेही स्टेडियममध्ये मोठय़ा संख्येने येतील. राहुल गेल्या महिन्यात आशिया चषक स्पर्धेनंतर चांगली कामगिरी केली आहे. सर्व बाजूने टीका होत असतानाही संघ व्यवस्थापनाने राहुलवर विश्वास दाखवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची गोलंदाजी चांगली राहिली. संघ व्यवस्थापनाने तीन फिरकीपटूंसह न खेळण्याचा निर्णय घेतला तर, अश्विनच्या जागी मोहम्मद शमीला स्थान मिळू शकते. दुसरीकडे, बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ चांगल्या कामगिरीच्या इराद्याने मैदानात उतरेल. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी नेहमीच चमक दाखवली आहे. मात्र, फलंदाजांनाही त्यांना साथ देणे अपेक्षित आहे. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज चांगल्या लयीत दिसत आहे. बांगलादेशविरुद्ध संघ १५६ धावांवर आटोपला होता. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. संघाच्या फिरकीची मदार अनुभवी रशीद खान व युवा मुजीब उर रहमानवर असेल.
गिल पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसही मुकणार?
’भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल डेंग्यूच्या आजारातून बरा होत असून, त्याला मंगळवारी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मात्र, गिल अजूनही सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही तो खेळण्याची शक्यता कमीच आहे.
’गिलला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेंग्यूच्या आजाराबरोबर गिलच्या शरीरारातील रक्तपेशी (प्लेटलेट्स) एक लाखाहून कमी झाल्या होत्या. गिलला प्रसिद्ध अशा कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीय संघाचे डॉक्टर रिझवान गिलच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.
’पहिल्या सामन्यासाठी चेन्नईत दाखल झाल्यावर गिलला विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गिल पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. गिल बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठीही खेळू शकणार नाही. गिलला एक आठवडा पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. साहजिकच गिल पाकिस्तानविरुद्धही खेळू शकणार नाही. पुण्यात १९ डिसेंबरला होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या उपलब्धतेविषयी शंकाच उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> World Cup 2023: इंग्लंडचा कर्णधार BCCIवर भडकला, धरमशालाच्या आउटफिल्डवर बोलताना म्हणाला, “यावर क्षेत्ररक्षण करणे म्हणजे…”
’गिल गेले काही दिवस चेन्नईतच भारतीय संघ उतरला होता त्या हॉटेलमध्येच आहे. गिलच्या शरीरातील रक्तपेशी (प्लेटलेट्स) ७० हजापर्यंत खाली उतरल्या होत्या.
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरान यांच्याकडून संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीच्या कामगिरीवरही लक्ष राहील.
* अफगाणिस्तानला विजय नोंदवायचा झाल्यास रशीद खान व मुजीब उर रहमान या फिरकीपटूंना चमकदार कामगिरी करावी लागेल. नूर अहमदला संधी मिळल्यास तोही अचूक मारा करण्यास सक्षम आहे.
*वेगवान गोलंदाज फजलहक फारूकी व नवीन उल हक यांनी सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद केल्यास फिरकीपटूंना दबाव निर्माण करण्यास मदत मिळेल. त्यामुळे त्यांना प्रभावी मारा करण्याची आवश्यकता आहे.
भारत
* भारताचा सलामीवीर रोहित शर्मा व इशान किशन यांच्यावर संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असेल. मधल्या फळीत श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडेही लक्ष राहील.
* विराट कोहली व रोहित शर्मा यांच्याकडून संघाला पहिल्या सामन्यातील कामगिरीच्या पुनरागमनाची अपेक्षा असेल. त्यातच विराट आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्याच्याकडे लक्ष राहील.
* भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांच्यावर संघाची मदार असेल. त्यांना मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा व हार्दिक पंडय़ा यांच्याकडून गोलंदाजीत साथ मिळेल. त्यामुळे सध्या तरी भारताचे पारडे जड दिसत आहे. * वेळ : दुपारी २ वा. ल्लथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)