पीटीआय, चेन्नई
पाकिस्तानला ‘आयसीसी’ विश्वचषक स्पर्धेत आपले आव्हान टिकवायचे असल्यास ‘चेपॉक’च्या धिमी गतीच्या गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर सोमवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत फिरकीपटूंचा सावधपणे सामना करावा लागेल.
गेल्या दोन सामन्यांत भारत व ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला या लढतीत विजय अनिवार्य आहे. तसे न झाल्यास उपांत्य फेरीत पोहोचण्याची त्यांची वाट बिकट होऊ शकते. पाकिस्तानचे चार सामन्यांनंतर चार गुण आहेत आणि ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. त्यांची निव्वळ धावगती -०.४५६ असून त्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांना अजूनपर्यंत फिरकीपटूंसमोर चांगली कामगिरी करता आलेली नाही. बंगळूरु येथील फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झ्ॉम्पासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. अफगाणिस्तान संघाकडे चांगले फिरकीपटू आहेत. ज्यामध्ये रशीद खान, मोहम्मद नबी व मुजीब उर रहमान यांचा समावेश आहे. त्यामुळे ‘चेपॉक’ सारख्या फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर त्यांचा सामना करणे सोपे नाही.
पाकिस्तानच्या फलंदाजांना विशेष करून कर्णधार बाबर आझमला चांगली कामगिरी करावी लागेल. बाबरला स्पर्धेत आतापर्यंत छाप पाडता आलेली नाही. यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान हा चांगल्या लयीत आहे आणि पाकिस्तानची मदार त्याच्यावर असेल. मध्यक्रमात सौद शकील व इफ्तिखार अहमद यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. तसेच, त्यांच्या गोलंदाजांनीही निराशा केली आहे. शाहीन शाह अफ्रिदीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच गडी बाद करताना लयीत येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, हॅरिस रौफ व हसन अली यांची लय संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद नवाझ, शादाब खान व उसामा मीर या फिरकीपटूंना छाप पाडता आली नाही.
अफगाणिस्तानचे फलंदाज पाकिस्तानच्या कमकुवत गोलंदाजी माऱ्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र, सलामी फलंदाज रहमनुल्लाह गुरबाझसह इतर फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. इकराम अलीखिल, अझमतुल्लाह उमरझई व हशमतुल्ला शाहिदी यांच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत सात सामने झाले असून सर्व सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
अफगाणिस्तान
’रहमानुल्ला गुरबाज व इब्राहिम झादरान यांच्याकडून संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या कामगिरीवरही लक्ष राहील.
’अफगाणिस्तानला विजय नोंदवायचा झाल्यास रशीद खान व मुजीब उर रहमान या फिरकीपटूंना चमकदार कामगिरी करावी लागेल. गेल्या सामन्यातील लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
’वेगवान गोलंदाज फजलहक फारूकी व नवीन उल हक यांनी सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद केल्यास फिरकीपटूंना दबाव निर्माण करण्यास मदत मिळेल.
पाकिस्तान
’पाकिस्तानच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार बाबर आझम, इमाम-उल-हक आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर अवलंबून आहे.
’अष्टपैलू इफ्तिखार अहमद, शादाब खान यांच्याकडून संघाला योगदान अपेक्षित आहे. गेल्या सामन्यात संधी मिळालेल्या उसामा मीरलाही फारशी छाप पाडता आली नाही.
’शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ व हसन अली यांच्यावर पाकिस्तानच्या गोलंदाजीची मदार आहे. मात्र, या तिघांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाला त्यांच्या या सामन्यात अपेक्षा असतील.
वेळ : दु. २ वा. ल्लथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)