पीटीआय, लखनऊ
आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा सामना शुक्रवारी ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्सशी होणार आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंकडे लक्ष असेल. या सामन्यात अफगाणिस्तानचा प्रयत्न दोन गुणांसह आपली निव्वळ धावगती वाढवण्याचा राहील. अफगाणिस्तानचे सहा गुण झाले असून नेदरलँड्सचे चार गुण आहेत. नेदरलँड्सला उपांत्य फेरीतील आपले आव्हान टिकवून ठेवायचे असल्यास मोठय़ा विजयाची आवश्यकता आहे.
पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्धच्या विजयात अफगाणिस्तानच्या शीर्ष फलंदाजी फळीने आपली छाप पाडली होती. अॅशेस मालिका जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग असलेले जॉनथन ट्रॉट अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक आहेत आणि ट्रॉटच्या मार्गदर्शनाखाली संघाने चमकदार कामगिरी केली आहे. नेदरलँड्सविरुद्धही संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कारण, त्यानंतर सात नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया व १० नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका संघाशी त्यांची गाठ पडणार आहे.
हेही वाचा >>>IND vs SL, World Cup 2023: श्रेयस अय्यर झेलबाद होताच अथिया शेट्टी झाली नाराज, VIDEO होतोय व्हायरल
नेदरलँड्सने या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघाला नमवत धक्कादायक निकालाची नोंद केली. या कामगिरीमुळे ते गुणतालिकेत बांगलादेश आणि इंग्लंड संघाच्याही पुढे आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानला त्यांना कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तान व अफगाणिस्तान संघांचे सहा गुण असून शीर्ष चार संघांबाहेर असलेले दोन अन्य संघ आहेत, जे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे आपले आव्हान टिकवून आहेत. मात्र, अफगाणिस्तानची निव्वळ धावगती (-०.७१८) पाकिस्तानच्या (-०.०२४) तुलनेने कमी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
हेही वाचा >>>IND vs SL, World Cup 2023: मोहम्मद शमीचा ऐतिहासिक पराक्रम, भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला गोलंदाज
अफगाणिस्तानची ताकद नेहमीच गोलंदाजी राहिली आहे. मात्र, यावेळी त्यांच्या फलंदाजांनी चमक दाखवली आहे. कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (२२६) आणि अझमतुल्ला ओमरझई (२०३) यांसह रहमानुल्ला गुरबाझ (२२४), रहमत शाह (२१२), इब्राहिम झादरान (२१२) यांनी संघासाठी धावा केल्या आहेत. रशीद खान व मुजीब उर रहमान एकाना स्टेडियमवर गोलंदाजी करण्यास उत्सुक असतील. कारण, खेळपट्टीतून फिरकीपटूंना मदत मिळते. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील नेदरलँड्सने गेल्या सामन्यात बांगलादेशला नमवत सर्वाचे लक्ष वेधले होते. संघाकडे साइब्रँड एन्गलब्रेट, कॉलिन एकरमन आणि लोगान व्हॅन बीकसारखे फलंदाज आहेत.
वेळ : दुपारी २ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप