ज्ञानेश भुरे
Men’s Cricket World Cup 2023 : पुणे : सलग तीन विजयांनंतर विश्वचषकाच्या प्रवासात चौथ्या सामन्यात बांगलादेशाला सामोरे जाताना भारतीय संघाचे सगळे प्रयत्न हे विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी अग्रस्थान पुन्हा मिळवण्याचे असतील. सलग तीन विजय मिळवल्यानंतर खरे तर, भारतीय संघासाठी सिद्ध करण्याचे काहीच राहिलेले नाही. त्यांना फक्त आपणच आखलेल्या मार्गावर मार्गक्रमण करायचे आहे. त्यामुळे गुरुवारी भारताचा आणखी एक विजय पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची खेळपट्टी आपल्या लौकिकाला साजेशी अशीच फलंदाजीला साथ देणारी आहे. हवेत उष्णता मोठय़ा प्रमाणावर असली, तरी याचा त्रास संध्याकाळपर्यंतच होईल. त्यानंतर हवेतील थंडपणा निश्चितच उत्साह वाढवणारा ठरेल. फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी आणि लहान सीमारेषा यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडल्यास आश्चर्य वाटणार नाही. असह्य उकाडय़ाने पुणेकरांना पावसाच्या एक सरीची प्रतीक्षा असली, तरी ती अशा रीतीने धावांच्या पावसामुळे पूर्ण होऊ शकते. खेळपट्टीवर चेंडू सहजपणे येणार आहे आणि सीमारेषाही लहान असल्यामुळे गोलंदाजांना सामन्यात विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा >>>World Cup 2023: पाकिस्तानच्या तक्रारीवर ICCकडून कारवाई होण्याची शक्यता कमी, जाणून घ्या काय म्हणतात नियम?
भारत आणि बांगलादेश या प्रतिस्पध्र्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताला या सामन्यातून वेगळे असे काहीच साध्य करायचे नाही, तर दुसरीकडे बांगलादेश संघाला खूप काही सिद्ध करायचे आहे. स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारतीय संघ सलग तीन विजय मिळवून चांगल्या लयीत आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील यशाचा स्वत:चा वेगळा असा मार्ग आखला आहे. त्या मार्गावरून चालण्यासाठी आता फक्त भारताला सातत्य दाखवायचे आहे. बांगलादेशला मात्र लयीमध्ये असणाऱ्या भारताला रोखण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.
भारत
’कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर चांगल्या धावा करत आहेत. यांना आता शुभमन गिलची साथ मिळणार आहे. गिलच्या आगमनामुळे भारतीय फलंदाजीला चांगलीच बळकटी आली आहे.
’दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या बुमराने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याला मोहम्मद सिराज, अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांची चांगली साथ मिळताना दिसत आहे.
’चायनामन कुलदीप यादवच्या फिरकीपुढे प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याला अष्टपैलू रवींद्र जडेजाची योग्य साथ लाभत आहे. तसेच, अनुभवी फिरकीपटू अश्विनला या सामन्यात संधी मिळते का याकडे सर्वाचे लक्ष राहील.
’या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
हेही वाचा >>>Rohit Sharma: रोहित शर्माचा निष्काळजीपणा; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुणे पोलिसांची कारवाई, नेमकं प्रकरण काय?
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
बांगलादेश
’बांगलादेशकडून फलंदाजीत लिटन दास, तौहिद हृदय, नजमुल शंटो यांच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्याला अनुभवी मुशफिकूर रहीमचीही साथ लाभेल.
’मेहदी हसन मिराज आणि महमदुल्ला यांच्या रूपाने संघाकडे चांगले अष्टपैलू आहे आणि वेळोवेळी त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध देखील केली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची राहील.
’संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा ही तस्किन अहमद, मुस्तफिझूर रहमान, शोरीफुल इस्लाम यांच्यावर असणार आहे. त्यामुळे संघाला त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल.
’कर्णधार शकिबने फिरकीचा भार उचलला आहे. मात्र, शकिबच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या खेळण्याबाबत जरा सांशकता आहे. शकिब खेळू न शकल्यास बांगलादेश संघ अडचणीत येऊ शकतो.
हेही वाचा >>>IND vs BAN live streaming: भारत-बांगलादेश सामन्याचे विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
बांगलादेश : शकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शंटो, तौहीद हृदय, मुशफिकूर रहीम, महमदुल्ला रियाद, मेहदी हसन मिराज, नासुम अहमद, महेदी हसन, तास्किन अहमद, मुस्तफिझूर रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.
सूर्यकुमार, अश्विन आणि शमी यांना संघाबाहेर ठेवणे खरेच कठीण होते. त्यापेक्षा ते अधिक आव्हानात्मक होते; पण सद्यपरिस्थितीत संघ चांगली कामगिरी करत असताना त्यात बदल करण्याची खरेच काही गरज नाही. मुख्य म्हणजे खेळाडूंमध्ये चांगला सुसंवाद आहे. – पारस म्हाम्ब्रे, भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुरेशी विश्रांती मिळाली असून, सरावासही चांगला वेळ मिळाला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध खेळताना आमचे खेळाडू ताजेतवाने राहतील. फलंदाजीला अनुकूल अशी खेळपट्टी आहे. सीमारेषाही लहान आहे. त्यामुळे एक चांगल्या धावसंख्येचा सामना येथे पाहायला मिळेल. – चंडिका हाथुरसिंघा, बांगलादेशचे प्रशिक्षक
’ वेळ : दुपारी २ वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्या)