अहमदाबाद : मुंबई-अहमदाबाद विमान तिकीट किमान नऊ हजार रुपये, तीन हजार रुपयांचा दर असलेली हॉटेलातील खोली २० हजार रुपये, पंचतारांकीत हॉटेलातील रूमचे दर दोन लाख रुपये.. भारतीय संघ विश्वचषक उंचावतानाच्या जल्लोषाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आयत्या वेळी अहमदाबादची वाट धरू पाहणाऱ्यांच्या वाटेत हॉटेलचालक आणि विमानकंपन्यांच्या नफेखोरीने अडथळे उभे केले आहेत. केवळ अहमदाबादच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील हॉटेलांचे दर गगनाला भिडले असून विमानांच्या तिकिटांमध्येही तीन ते पाचपट वाढ झाली आहे.

मुंबईत उपान्त्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने देशात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. सामन्याच्या दिवशी, म्हणजे रविवारी एका रात्रीसाठी पंचतारांकित हॉटेलांचे एका खोलीचे दर दोन लाखांच्या घरात पोहोचले आहेत. साध्यासुधे लॉज, हॉटेलांनीही आपल्या दरांत पाच ते सात पट वाढ केली आहे. अंतिम सामन्याबाबत भारतातच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दुबईतही उत्साहाचे वातावरण असून तिथूनही काही प्रेक्षक येण्याची शक्यता असल्याचे गुजरातमधील हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सोमानी यांनी सांगितले. मागणी वाढल्याने दरही वाढले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हॉटेलांची ऑनलाईन नोंदणी घेणाऱ्या संकतेस्थळांवरील दर दोन लाखांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. बिगरतारांकित हॉटेलांनीही दरांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. एका खोलीसाठी एका रात्रीला तीन-चार हजापर्यंत दर असलेल्या हॉटेलांनीही दर २० हजार रुपयांपर्यंत नेले आहेत.

हेही वाचा >>> ‘आयसीसी’चे खेळपट्टी सल्लागार अ‍ॅटकिन्सन पुन्हा चर्चेत! शुक्रवारी मैदानावर अनुपस्थित, अंतिम सामन्याच्या खेळपट्टीची आज पाहणी

विमान तिकिट पाचपट महाग

* दुसरीकडे या संधीचा फायदा विमान कंपन्यांनीही घेण्यास सुरूवात केली आहे. देशातील विविध शहरांकडून अहमदाबादकडे येणाऱ्या विमानांची तिकिटे प्रचंड महागली आहेत.

* चेन्नई-अहमदाबाद हे सामान्यत: पाच हजारांना असलेले तिकीट १६ ते २५ हजारांच्या घरात गेले आहे. मुंबई ते अहमदाबाददरम्यानचे विमान तिकीट साधारणपणे अडीच ते तीन हजारांच्या आसपास असते.

* ते १८ आणि १९ नोव्हेंबर रोजीच्या विमानांसाठी नऊ हजारांहून अधिक झाले आहे. यातही काही विमानांचे तिकीटदर चाळीस हजारांवर पोहोचले आहेत.

* अंतिम सामना बघण्याची संधी दुर्मिळ असल्यामुळे क्रिकेट चाहते आनंदाने वाढीव दर देत असल्याचे पर्यटन सल्लागार मनूभाई पंचोली यांनी सांगितले.

Story img Loader