लागोपाठ दोन विजय मिळवल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याचे वेध लागले आहेत. मात्र त्यासाठी दक्षिण आफ्रिकेला शनिवारी होणाऱ्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा पाडाव करावा लागणार आहे.
द. आफ्रिकेला सलामीच्या सामन्यात श्रीलंकेकडून ५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर न्यूझीलंड आणि नेदरलँड्सवर विजय मिळवून आफ्रिकेने बाद फेरीतील आव्हान कायम राखले होते. इंग्लंडचीही सुरुवात पराभवाने झाली होती. न्यूझीलंडविरुद्धचे पराभवाचे दु:ख बाजूला सारून इंग्लंडने श्रीलंकेचा पाडाव केला होता.
दक्षिण आफ्रिकेला दोन्ही सामन्यात गोलंदाजांनी तारले होते. न्यूझीलंडविरुद्ध डेल स्टेनने चार बळी मिळवत विजय मिळवून दिला होता. त्यानंतर इम्रान ताहीरने आपल्या फिरकीच्या तालावर नेदरलँड्सला रोखले होते. फलंदाजीत जे. पी. डय़ुमिनीच्या कामगिरीत सातत्य नाही. फॅफ डू प्लेसिस आणि ए बी डी’व्हिलियर्स फॉर्मात नाहीत.
अ‍ॅलेक्स हेल्सच्या नाबाद ११६ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने श्रीलंकेचे १९० धावांचे आव्हान पार केले होते. या सामन्यात इंग्लंडने चार झेल आणि धावचीतच्या संधी वाया घालवल्या होत्या. इंग्लंडला या चुका सुधाराव्या लागणार आहेत.