जळगाव : पुणे, मुंबई शहर महिला, तर मुंबई शहर, नगर संघांनी शनिवारपासून सुरू झालेल्या २१व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुंबईच्या विजयात सुशांत साईलने एकाच चढाईत ४ गडी टिपताना सर्वाचे लक्ष वेधून घेतले.जळगाव येथील सागर पार्क मैदानात मॅटवर खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत महिलांच्या अ-गटात पुण्याने नागपूरला तुफानी खेळ करत ६६-२२ असे पराभूत केले. पहिल्या डावात ४ लोण देत ४३-०७ अशी आघाडी घेत पुणे संघाने विश्रांतीलाच विजय निश्चित केला. निकिता पडवळ, आम्रपाली गलांडे, पूजा शेलार यांचा चतुरस्त्र खेळ पुण्याच्या विजयात महत्त्वाचा ठरला. नागपूरची तनुश्री ठाकरे चमकली. महिलांच्या ब-गटात मुंबई शहरने श्रद्धा कदम, पूजा यादव यांच्या झंझावाती चढाया तर, मेघा कदम, पौर्णिमा जेधे यांचा भक्कम बचाव यांच्या जोरावर अमरावतीला ६६-१२ असे सहज नमवले. पूर्वार्धात ३ लोण देत ३६-०४ अशी आघाडी घेणाऱ्या मुंबईने उत्तरार्धात देखील ३ लोण देत ५४ गुणांच्या फरकाने दणदणीत विजय साकारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरुषांच्या अ-गटात मुंबई शहरने अमरावतीला ७१-२७ असे सहज पराभूत करताना चांगली सुरुवात केली. प्रणव राणे, सुशांत साईल यांच्या आक्रमक चढायांना संकेत सावंत, हर्ष लाड यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरली. निर्विवाद वर्चस्व राखलेल्या सामन्यात मुंबईने दोन्ही डावात ३-३ लोण नोंदविले. पुरुषांच्या ब-गटात नगरने मध्यांतरातील १७-२७ अशा १० गुणांच्या पिछाडीवरून वाशीम संघाचा कडवा प्रतिकार ५०-४२ असा मोडून काढला. आकाश चव्हाण, अब्दुल शेख यांनी उत्कृष्ट खेळ करत वाशीम संघाला विश्रांतीला आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते. पण, उत्तरार्धात नगरच्या आदित्य शिंदे, शिवम पठारे यांनी चढाईचा तुफानी खेळ करीत ३ लोण देत विजयश्री खेचून आणली. अजित पवारने भक्कम पकडी करीत मोलाचा वाटा उचलला.