मुंबई : महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यापाठोपाठ मुंबईकरांसाठी काँग्रेसकडून ‘मुंबईनामा’ घोषित करण्यात आला आहे. काँग्रेसने धारावी पुनर्विकासाचे आश्वासन देतानाच अदानींना देण्यात आलेले कंत्राट मात्र रद्द करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. मच्छीमारांना पाच लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येईल आणि गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी सरकार तीन महिन्यांत घेईल, असे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले आहे.

धारावी पुनर्विकासात ५०० चौरस फुटांचे घर आणि ज्यांच्या उद्याोग व व्यावसायिक जागा आहेत, त्यांनाही पुनर्विकासात जागा देण्यात येईल. या उद्याोगांमधील मालाची निर्यात करण्यासाठी विशेष केंद्र निर्माण केले जाईल. मुंबई महानगर क्षेत्रात ५० हजारांहून अधिक इमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्र नसून ते सहा महिन्यांत देण्यात येईल. मुंबई काँग्रेस अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

हेही वाचा >>> उलेमांचा पूर्वी भाजपलाही पाठिंबा ‘तो व्होट जिहाद नाही का’

काँग्रेसचा मुंबईनामाजाहीर ; मुंबईनाम्यावर बाळासाहेबांचे छायाचित्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी गौरवोद्गार काढावेत, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क येथील सभेत केली होती. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या ‘मुंबईनामा’वर बाळासाहेब ठाकरे यांचे इतरांपेक्षा मोठे छायाचित्र छापण्यात आले आहे. पत्रकार परिषदेच्या फलकावरही बाळासाहेबांचे मोठे छायाचित्र लावण्यात आले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांचे छायाचित्र वापरण्यात आलेले नाही.

जाहीरनाम्यातील आश्वासने

● विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात गृहनिर्माण सोसायट्यांवरील १८ टक्के जीएसटी कमी करून ५ टक्के करणार

● भूमिपुत्रांना नोकऱ्यांत प्राधान्य

● झोपडपट्टी व मुलींच्या शाळांमध्ये एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन

● महिलांसाठी सुरक्षित व परवडणारी वसतिगृहे

● मुंबईत हाताने होणारी साफसफाई थांबवून स्वयंचलित ड्रेन सफाई तंत्रज्ञान व कौशल्य विकास केंद्र स्थापणार

● बुद्ध विहारांना निधी देणार

● मुंबईतील ससून व माझगाव बंदरासह वरळी व वांद्रे येथे मत्स्य उत्पादन विपणन परिषदेची स्थापना

● कोळीवाड्यातील गावठाण क्षेत्रांचा विकास

● मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार