भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. वन-डे मालिकेत 2-1 विजय मिळवल्यानंतर संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला बऱ्याच वेळा टिकेचा सामना करावा लागला. यामध्ये सुनिल गावसकर यांच्यासह अनेक माजी खेळाडूंचाही समावेश होता. यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलत असताना रवी शास्त्री यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते ‘ द डेली टेलिग्राफ ‘ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

” तुमच्यावर टीका होणं हा भाग समजू शकतो. पण ती टीका जर चांगल्या भावनेतून होणार असेल तर मला काहीही हरकत नाही. पण जर ही टीका कोणीही जाणूनबुजून करत असेल तर मग मी शांत बसणार नाही. टीका करणारा माणूस दिग्गज खेळाडू आहे की कोणी दुसरा माणूस याचा मी विचार करणार नाही. मला प्रत्युत्तर देणं गरजेचं वाटलं, तर त्यावेळी मी नक्की देईन. ” इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉर्नला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री बोलत होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान पर्थ कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर सुनिल गावसकर यांनी संघाच्या सरावपद्धतीवर व अन्य बाबींवर टीका केली होती. मात्र याच टीकेमुळे मेलबर्न कसोटीत भारतीय संघ सर्वोत्तम खेळ करु शकला, रवी शास्त्री बोलत होते. यावेळी रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या खेळाचंही कौतुक केलं. प्रत्येक सामन्याआधी नेट्समध्ये सरावादरम्यान मेहनत करणं, कसोटी- वन-डे आणि टी-20 प्रमाणे स्वतःची शैली बदलणं या सर्व गोष्टी विराटने उत्तम केल्या असल्याचं शास्त्री म्हणाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

अवश्य वाचा – Video : हा चेंडू पकडा, नाहीतर म्हणाल निवृत्त होतोयस का?

Story img Loader