जागतिक स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असल्याचे मी मनोमन ठरवले होते आणि पदक मिळाले नसते, तर कुस्ती सोडणार होतो. परंतु ही अखेरची संधीच सुवर्णसंधी ठरली, अशा शब्दांत संदीप यादवने आपल्या यशाचे गुपित उलगडले. नुकत्याच बुडापेस्ट येथे झाल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत संदीप तुलसी यादवने ऐतिहासिक कांस्यपदक मिळवत भारताला प्रथमच ग्रीको-रोमन प्रकारामध्ये पदक जिंकवून देण्याची किमया साधली.
‘‘कुस्तीच्या फ्री-स्टाइल प्रकारांमधील मल्लांचे चांगले नाव होते, त्यांना पदक आणि प्रसिद्धी मिळते. पण ग्रीको-रोमन प्रकारामध्ये कितीही मेहनत करून फायदा होत नाही. कारण पदक आतापर्यंत मिळाले नाही आणि कदाचित यापुढेही नाही, त्यामुळे कुस्ती सोडण्याचा विचार मी केला होता. नैराश्येने मला ग्रासले होते, कारण मेहनत करून हाती काहीही लागत नव्हते. मी उगाचच कुस्तीमध्ये आलो, असे वाटते होते. मी हा विचार प्रशिक्षक जगमल सिंग यांना बोलून दाखवला आणि त्यांनी मला खडे बोल सुनावले, एवढय़ावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी मला आत्मविश्वास दिला. प्रामाणिकपणे केलेली मेहनत कधी फुकट जात नाही,’’ असे संदीपने सांगितले.
स्पर्धेच्या तयारीबाबत विचारल्यावर संदीप म्हणाला की, ‘‘स्पर्धेच्या दोन महिन्यांपूर्वी मी कुस्ती सोडण्याचा विचार केला होता. कारण मला कुस्तीत यापुढे कारकीर्द घडवता येईल असे वाटत नव्हते. प्रत्येक वेळी पराभव आणि निराशाच पदरी पडायची, त्यामुळे कुस्ती सोडायचा निर्णय मी घेतला. तेव्हा जगमल सिंग यांनी माझी समजूत घातली. त्यांनी मला मेहनत करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हंगेरीमध्ये झालेल्या शिबिराचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी फार मोठा फायदा झाला.’’
कांस्यपदकाच्या सामन्यासाठी मॅटवर उतरल्यावरची आपली मनस्थिती मांडताना संदीप म्हणाला की, ‘‘शिबिरात चांगली तयारी झाली होती आणि त्यामुळेच एक विश्वास निर्माण झाला की, आपण परदेशी मल्लांना पराभूत करून पदक कमावू शकतो. त्यामुळे मैदान मारायचेच, या मानसिकतेने उतरलो आणि माझ्याकडून इतिहास रचला गेला. जेव्हा कांस्यपदक पटकावले, तेव्हाच्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. पदक पटकावल्यावर डोळ्यांत पाणी तरळले आणि त्यामध्ये भारताचा तिरंगा झेंडा दिसत होता.’’
आपल्या भविष्यातील योजनांविषयी संदीप म्हणाला की, ‘‘या पदकाने माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. आता कुस्ती सोडण्याचा विचार मनात कधीही येणार नाही. आता पुढे आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धासाठी मी तयारी करणार आहे.’’
‘‘जागतिक स्पर्धेच्या दोन महिन्यांपूर्वी संदीपने मला कुस्ती सोडण्याचा निर्णय कळवला आणि मला धक्का बसला. कारण संदीप अथक मेहनत घेऊन सराव करत होता, पण त्याला पदक मिळत नव्हते. पण मला त्याच्यावर विश्वास होता की, एक दिवस नक्कीच पदक जिंकेल. त्यामुळे त्या वेळी एक प्रशिक्षक म्हणून त्याला मानसिकरीत्या कणखर बनवण्याचा प्रयत्न केला. मेहनतीचे फळ नक्कीच मिळते हे त्याला सांगितले आणि तसेच झाले. माझ्या शिष्याने पदक मिळवून इतिहास रचला याचा मला सर्वोच्च आनंद झाला आहे. आता ग्रीको-रोमनकडे बरेच युवा मल्ल आत्मविश्वासाने वळतील. आता संदीपकडून आशियाई आणि ऑलिम्पिकपदकाची आशा करू शकतो!’’              
 -जगमल सिंग, संदीपचे प्रशिक्षक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा