रवी शास्त्री हे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने डावपेच ठरवतील. या कामात संजय बांगर आणि भरत अरुण त्यांना सहकार्य करतील. फ्लेचर यांना काही भूमिकाच शिल्लक राहिलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेपूर्वी त्यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना थांबवणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
एकदिवसीय मालिकेसाठी संघाचे संचालक म्हणून रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आल्याने फ्लेचर यांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फ्लेचर यांना प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्यासंदर्भात विचारले आहे का, यावर बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले की, ‘‘आम्ही त्यांना पुरेसे संकेत दिले आहेत. संजय बांगरने विविध स्तरांवर प्रशिक्षणाचे काम पाहिले आहे. संघातील बहुतांशी खेळाडू बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. त्यामुळे फ्लेचर यांच्यासाठी काही कामच उरलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा दिल्यास आम्ही तो स्वीकारू.’’
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघातील खेळाडू चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत सहभागी होतील. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. मात्र या मालिकेपर्यंत फ्लेचर प्रशिक्षकपदी असतील की नाही याबाबत संदिग्धता आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला खडतर अशा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला सामोरे जायचे आहे.
फ्लेचर यांचा प्रशिक्षकपदाचा करार २०१५ पर्यंत आहे. मात्र त्यांना पद सोडण्याची मुभा करारात आहे. प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविडचे नाव चर्चेत होते. मात्र भारतीय क्रिकेट संघाचे व्यस्त वेळापत्रक पाहता, पूर्णवेळ प्रशिक्षकपदासाठी द्रविड उत्सुक नाही. फ्लेचर यांच्या कार्यक्षमतेवर बीसीसीआयने चर्चा केली मात्र धोनीला कर्णधारपदावरून दूर करण्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader