Shubman Gill reaction after defeat : टी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडियाने करोडो चाहत्यांची मनं जिंकली. आतापर्यंत चाहते खूप आनंदी दिसत होते, मात्र युवा संघाची झिम्बाब्वेविरुद्धची लाजिरवाणी कामगिरी पाहून चाहते नाराज झाले आहेत.झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला १३ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव अवघ्या १०२ धावांवर गारद झाला. या पराभवानंतर संघाचा कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुबमन गिलची पराभवावर प्रतिक्रिया –

सामन्यानंतर शुबमन गिल म्हणाला, “आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली, पण आम्ही क्षेत्ररक्षणात कमी पडले. आम्ही संघाला शोभेल अशी फलंदाजी केली नाही आणि प्रत्येकजण थोडा थकलेला दिसत होता. तसेच प्रत्येकाला खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर फलंदाजीचा आनंदा घ्यायचा होता, परंतु तसे होऊ शकले नाही. आम्ही अर्ध्या वाटेत ५ विकेट्स गमावल्या. मी शेवटपर्यंत टिकून राहिलो असतो तर आमच्यासाठी चांगले ठरले असते. मी ज्या प्रकारे आऊट झालो त्यामुळे मी खूप निराश आहे. उर्वरित सामना आमच्या हातून निसटला. आमच्यासाठी थोडी आशा होती पण जेव्हा तुम्ही ११५ धावांचा पाठलाग करत असता आणि तुमचा १०व्या क्रमाकाचा फलंदाज सामना जिंकवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तुम्हाला कळते की काहीतरी गडबड आहे.”

टीम इंडियाची फलंदाजी ठरली अपयशी –

११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने पॉवर प्लेमध्येच ४ विकेट्स गमावल्या. यानंतरही एकामागून एक विकेट पडतच राहिल्या. ज्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला शुबमन गिलने २९ चेंडूंत ५ चौकारांसह ३१ धावा केल्या. अभिषेक शर्मा, रिंकू सिंग आणि मुकेश कुमार खाते न उघडताच बाद झाले. ऋतुराज गायकवाडने ७, रियान परागने २, ध्रुव जुरेलने ६, वॉशिंग्टन सुंदरने २७, रवी बिश्नोईने ९ आणि आवेश खानने १६ धावा केल्या. अशा भारतीय संघाची फलंदाजी पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली.

हेही वाचा – झिम्बाब्वेची विजयी सलामी! विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ पहिल्याच सामन्यात ठरली अपयशी

भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव –

झिम्बाब्वेने भारताविरुद्ध मोठी कामगिरी नोंदवली आहे. झिम्बाब्वेने जागतिक विजेत्या संघाविरुद्ध सर्वात कमी लक्ष्याचा यशस्वी बचाव केला आहे. ११६ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव करणे ही भारताविरुद्धच्या टी-२० मधील कोणत्याही संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता, ज्याने २०१६ मध्ये भारताला दिलेल्या १२७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला होता.

हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 : भारतीय संघात तीन युवा खेळाडूंनी केले पदार्पण, शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मिळाली संधी

भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारे संघ –

११६ झिम्बाब्वे, २०२४
१२७ – न्यूझीलंड, २०१६
१३१ दक्षिण आफ्रिका, २००९
१४६ झिम्बाब्वे, २०१६
१५० वेस्ट इंडिज, २०२३

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If i survive till the end shubman gill honest verdict on indias shocking loss to zimbabwe in 1st t20i vbm