परस्पर हितसंबंधांचा संघर्ष ऐरणीवर असताना एन. श्रीनिवासन यांची भूमिका, डीआरएसला असलेला भारताचा विरोध आणि महेंद्रसिंग धोनीचे स्वप्नवत नेतृत्व आदी विषयांवर भारताचा माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी सडेतोड भाष्य करीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)ची एक प्रकारे वकिलीच केली. भारताचे माजी कसोटीपटू दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानमालेनिमित्त शुक्रवारी बॉम्बे जिमखाना येथील सभागृहात शास्त्री यांनी ‘क्रिकेटची सद्यस्थिती’ या विषयावर आपली परखड मते मांडली.
‘‘बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले एन. श्रीनिवासन उत्तम प्रशासक आहेत. क्रिकेटवर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. ते सध्या दुष्टचक्रात अडकले आहेत. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयपासून दूर रहावे, याविषयी सध्या जोरात चर्चा सुरू आहे. जर मी त्यांच्या जागी असतो किंवा मी कर्णधार असलेल्या संघातील तीन खेळाडू फिक्सिंगमध्ये सापडले असते किंवा मी राजकारणात असतो आणि माझ्या पक्षातील व्यक्ती भ्रष्टाचारात अडकले असते, तर मी राजीनामा दिला नसता. याच कठीण काळात खरे तर संघाची जबाबदारी सांभाळायची असते,’’ असे शास्त्री यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘मला सलामीला फलंदाजीला उतरणार का? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा मी विचार करायला वेळ घेतला नाही. त्वरित हो म्हटले.’’
‘‘शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांच्या प्रयत्नांमुळे आयपीएल अस्तित्वात आले. त्यानंतर शशांक मनोहर यांनी मंडळाची धुरा सांभाळली. मग गेल्या काही वर्षांत विशेषत: मागील दहा वर्षांत बीसीसीआयची कामगिरी चांगली झाली आहे. या कालखंडात आपण तीन जागतिक विजेतेपदे काबीज केली आहेत. अन्य खेळात असे यश पाहायला मिळत नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये आपण दारुण पराभव पत्करला. परंतु या पराभवांतून आपण खूप काही शिकलो. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आपले स्थान वरचे आहे,’’ अशा शब्दांत शास्त्री यांनी बीसीसीआयच्या यशाचे पोवाडे गायले.
‘‘आम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात नक्कीच नाही. परंतु पंच पुनर्आढावा प्रक्रियेत सुधारणा होण्याची नितांत आवश्यकता आहे. पंचांच्या निर्णयाविरोधात साशंका प्रकट करायची नसते. परंतु डीआरए हे याच खेळभावनेच्या विरोधातील आहे. याचप्रमाणे यजमान संघांवर हॉक आय किंवा हॉटस्पॉटचा खर्च लादण्यापेक्षा आयसीसीने तो आर्थिक भार उचलावा,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘धोनी हा भारताचा सर्वात महान कर्णधार आहे. त्याने अनेक अविस्मरणीय विजय भारताला मिळवून दिले आहेत. तो शांत वृत्ती जोपासून भारताला यश मिळवून देतो.’’

Story img Loader