India vs Sri Lanka Asia Cup Final Match Fixtures: आशिया चषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात १७ सप्टेंबर रोजी आरके प्रेमदासा स्टेडियम कोलंबोयेथे होणार आहे. बांगलादेशने सुपर फोर टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताचा ६ धावांनी पराभव केला, मात्र अंतिम सामन्यावर त्याचा काही फरक पडला नाही. या स्पर्धेत सुपर फोर चे जवळपास सर्वच सामने पावसाने अडथळा निर्माण केला होता. अंतिम सामन्यातही पावसाची शक्यता आहे.अशा परिस्थितीत फायनलच्या दिवशी पाऊस पडला आणि पावसामुळे सामना वाया गेला, तर आशिया चषक ट्रॉफी कोणाला मिळणार? हा मोठा प्रश्न मनात नक्कीच निर्माण होत असेल, तर याबद्दल असणारे समीकरण जाणून घेऊया.
हवामानाच्या अंदाजानुसार, १७ सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र, थांबून-थांबून पाऊस होण्याची शक्यता आहे. ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून वारेही ताशी १८ किमी वेगाने वाहण्याची शक्यत आहे. अशा परिस्थितीत फायनलच्या दिवशी पाऊस पूर्णपणे अडथळा निर्माण करणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवसाचे आयोजन केले आहे.
अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आयोजन –
१७ सप्टेंबरला पावसामुळे सामना वाया गेला, तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. म्हणजेच अंतिम फेरीसाठी एक दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत १८ सप्टेंबरलाही पाऊस पडेल का? हा प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. १८ सप्टेंबर म्हणजेच राखीव दिवशीही पावसाची शक्यता ६९% आहे. अशा परिस्थितीत १७ आणि १८ तारखेला पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. तसेच, सुपर फोर टप्प्यातील सामन्यातही पावसाची शक्यता होती. त्यानंतर पाऊस पडला पण सर्व सामने पूर्ण झाले. अशा परिस्थितीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामनाही पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे कोणताही एक संघ विजेता ठरेल असे अपेक्षित आहे.
दोन्ही संघ एकदा ठरले आहेत संयुक्त विजेते –
२००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार होता, पण पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत १६६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने ९७ सामने जिंकले आहेत. याशिवाय श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. ११ सामन्यांचा निकाल जाहीर झाला नाही आणि १ सामना बरोबरीत संपला. या आशिया कपमध्ये भारताने सुपर फोर फेरीत श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला.
हेही वाचा – IND vs SL: ‘…म्हणून बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला’; कर्णधार रोहित शर्माने सांगितले कारण
कोलंबो, प्रेमदासा येथे भारत आणि श्रीलंकेचा रेकॉर्ड –
कोलंबोतील प्रेमदासा येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात ३७ एकदिवसीय सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने १८ वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने १६ सामने जिंकले आहेत. ३ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ११ वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर प्रथम खेळणाऱ्या श्रीलंकेने ११ वेळा भारताविरुद्ध विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ७ सामने जिंकले आहेत.