अॅडलेड कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात करत ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यष्टीरक्षक ऋषभ पंतने या सामन्यात यष्टींमागे ११ झेल पकडत महेंद्रसिंह धोनी आणि वृद्धीमान साहा या आपल्या दोन सहकाऱ्यांना मागे टाकलं. मात्र फलंदाजीमध्ये ऋषभला आपली चमक दाखवता आली नाहीये. खेळपट्टीवर आल्यानंतर ऋषभने आक्रमक पवित्रा घेत झटपट धावा जमवल्या खऱ्या, मात्र मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात तो झेलबाद झाला. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही, ऋषभ पंतने आता जबाबदारीने फलंदाजी करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

“सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये ऋषभला त्याच्या नैसर्गिक शैलीप्रमाणे खेळण्याची मूभा दिली पाहिजे, मात्र फलंदाजीदरम्यान त्याने आता थोडी जबाबदारी दाखवणं गरजेचं आहे. लॉयनच्या गोलंदाजीवर त्याने चांगला हल्लाबोल चढवला, त्यामुळे त्याने एखादी चूक केली तर ठीक आहे. मात्र त्याच चुकीची जर पुनरावृत्ती झाली तर मी त्याला नक्की झापेन.” पहिला सामना संपल्यानंतर रवी शास्त्री पत्रकारांशी बोलत होते. लॉयनच्या एका षटकात पंतने ३ चौकार आणि १ षटकार ठोकले, मात्र यानंतर लगेचच तो बाद होऊन माघारीही परतला.

अवश्य वाचा – IND vs AUS : इतर कर्णधारांप्रमाणे विराटही चूक करतोय – इयान चॅपल

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आश्वासक कामगिरीचं प्रदर्शन केलं होतं. दोन्ही डावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. या मालिकेतला दुसरा सामना १४ डिसेंबरपासून पर्थच्या मैदानावर सुरु होणार आहे. पर्थचं मैदान भारतापेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी अधिक लाभदायी ठरेल असा विश्वास माजी कर्णधार रिकी पाँटींग याने व्यक्त केला आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – वाहवत जाऊ नका, पाय जमिनीवर ठेवा ! माजी प्रशिक्षक जॉन राईट यांचा भारतीय संघाला सल्ला

Story img Loader