दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला निवड समितीने प्रमोशन दिलं आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यासोबतच रोहितला कसोटी मालिकेतही सलामीला येण्याची संधी मिळणार आहे. गेल्या काही मालिकांमध्ये लोकेश राहुल सतत अपयशी ठरत असल्यामुळे निवड समितीने राहुलला कसोटी संघातून डच्चू दिला आहे. रोहितकडे कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नसला तरीही त्याने काही महत्वाच्या सामन्यांमध्ये आश्वासक खेळी केली आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला आहे.
“कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये फरक असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पाच षटकांनंतर वन-डे क्रिकेटमध्ये चेंडू स्विंग होत नाही. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये ३५-४० षटकांनंतरही चेंडू स्विंग होतो. रोहित स्विंग होणाऱ्या चेंडूवर थोडासा अडखळतो, मात्र त्याने आपले फटके सुधारले तर तो कसोटी क्रिकेटमध्येही चांगल्या धावा करेल.” गावसकरांनी आपलं मत मांडलं.
कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याने बचावात्मक खेळाचं तंत्र आत्मसात करायला हवं. जेव्हा आपण बचावात्मक खेळाचा विचार करतो तेव्हा रोहित हा विरेंद्र सेहवागसारखा खेळाडू नाहीये. रोहित Pull आणि Hook चे फटके चांगले खेळतो. सेहवाग आपल्याकाळात ऑफ साईडला ठराविक फटके खेळायचा आणि गोलंदाजांच्या चांगल्या चेंडूवर बचावात्मक खेळायचा. जर रोहितने हे तंत्र आत्मसात केलं तर तो देखील कसोटी क्रिकेटमध्ये सेहवागसारखा यशस्वी खेळाडू ठरु शकतो, गावसकर रोहित शर्माच्या फलंदाजी शैलीबद्दल बोलत होते. २ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.