Wasim Jaffer says Tilak Verma should be given a chance: भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. या मालिकेत तो आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. तिसऱ्या सामन्यात तो ४९ धावा करून नाबाद राहिला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या तिलकचा विश्वचषकाच्या संघात समावेश करण्याबाबत आता अनेक दिग्गज बोलत आहेत. अशाच आता वसीम जाफरने तिलक वर्माबद्दल एक महत्त्वाच विधान केले आहे.
तिलक वर्माचा विश्चषकासाठीच्या टीम इंडियाच्या संघात स्थान दिले जावे, यासाठी आर आश्विन ते माजी निवडकर्ते एमएसके प्रसादपर्यंत आग्रही आहेत. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत केएल राहुल ते श्रेयस अय्यर दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नाहीत. अशा स्थितीत २० वर्षीय तिलक वर्माला मधल्या फळीत संधी देण्याची चर्चा आहे. आता अजित आगरकर यांची निवड समिती तिलक वर्माला विश्वचषकात संधी देते की नाही हे पाहावे लागेल.
श्रेयस अय्यरच्या जागी तिलक वर्माला संधी देण्याची मागणी –
माजी भारतीय यष्टीरक्षक एमएसके प्रसाद म्हणाले की, मला वाटते ही वाईट कल्पना नाही, जर श्रेयस अय्यरने संघात स्थान मिळवले नाही. त्यानंतरच तुम्ही तिलक वर्माचा विचार करू शकता, पण मला खात्री आहे की भविष्यात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारताचा नियमित खेळाडू असेल. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरही तिलकला विश्वचषकासाठी संघात स्थान देण्याच्या बाजूने दिसला.
हेही वाचा – Fire: ईडन गार्डन्स स्टेडियमला लागली आग, ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले सामान जळून खाक
क्रिकइन्फोशी बोलताना वसीम जाफरने सांगितले की, “आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कारण विश्वचषक सुरू होण्याआधी फक्त ९ सामने बाकी आहेत. तो म्हणाला की आदर्श परिस्थितीत खेळाडूला १५ ते २० सामने मिळावेत अशी आमची इच्छा आहे. श्रेयस आणि राहुल आशिया चषकासाठी तयार होतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण ते आशिया चषकासाठी तयार होऊ शकणार नाहीत हे आम्ही वाचत आहोत. ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असतील की नाही हे आम्हाला माहीत नाही. कारण त्यांची दुखापत किती गंभीर आहे, हे आम्हाला माहीत नाही.”
जाफर म्हणाला की, तुम्हाला खेळाडूची चाचणी घ्यायची असेल, तर तिलक वर्मा का नाही? खेळणारा कोणताही खेळाडू पुरेसा तयार होणार नसेल, तर मग तिलक वर्मा का नाही. मी त्याच्यावर पैज लावेन. तिलक वर्माने आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या तीनही टी-२० सामन्यात शानदारी कामगिरी केली आहे. ३० ऑगस्टपासून आशिया चषक आणि ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे.