कारकीर्द टिकवण्यासाठीच मी एकेरीचा त्याग केला आणि सर्व लक्ष दुहेरीवरच केंद्रित केले, असे मनोगत शनिवारी टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्तले. गेल्या पाच वर्षांत सानियाने तीन शस्त्रक्रियांचा सामना केला आहे. या शस्त्रक्रियांमुळेच एकेरीऐवजी दुहेरी प्रकारावर लक्ष एकाग्र करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियांनंतर पुनरागमन करणे खरंच कठीण असते, असे तिने सांगितले.
‘‘माझ्या कारकीर्दीत आठ वर्षे मला एकेरी आणि दुहेरी प्रकारात खेळता आले. याबाबतीत मी नशीबवान आहे. एकेरी प्रकारात खेळता न येत नसल्याची खंत जरूर आहे. परंतु एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला असता तर, एखाद्या वर्षांतच कारकीर्द संपुष्टात आली असती. मला तसे घडू द्यायचे नव्हते. टेनिसवर माझे मनापासून प्रेम आहे आणि आणखी काही वर्ष मला खेळायचे होते,’’ असे सानियाने स्पष्ट केले. ‘द कंट्री क्लब’ने सानिया मिर्झाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ती बोलत होती.
‘‘तंदुरुस्ती हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. टेनिसचा हंगाम सुरू आहे की नाही यावर आहाराचे स्वरूप ठरते. हंगाम सुरू असेल तर शरीराला अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. खाण्याच्या बाबतीत मी काटेकोर आहे. अती किंवा कमी खाण्यापेक्षा संतुलित खाण्यावर माझा भर असतो,’’ असे सानियाने सांगितले.