बीसीसीआयच्या शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान एन. श्रीनिवासन यांनी भूषविल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशारा बिहार क्रिकेट असोसिएशनने दिला आहे. याच असोसिएशनच्या जनहित याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयची चौकशी समिती बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवली होती.
‘‘बीसीसीआयने नेमलेली द्विसदस्यीय चौकशी समिती बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांनी अध्यक्षस्थान भूषविण्याचा अधिकार नाही. जर ते अध्यक्षस्थानी विराजमान झाले तर आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू. हा न्यायालयाच्या निर्णयाचा स्पष्टपणे अवमान ठरेल,’’ असे बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी सांगितले.