भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान किशन असे काही कृत्य केले होते, ज्यामुळे त्याच्यावर बंदी घालता आली असती. परंतु पंचांनी तक्रार न केल्याने इशान थोडक्यात बचावला. मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.
पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघ फलंदाजी करत असताना, १६ व्या षटकात इशानने लॅथम हिट विकेट झाल्याची अपील केली होती. ही अपील ऐकून लेग अंपायरने तत्काळ निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला. तिसर्या पंचाने रिप्ले पाहिल्यावर त्यांना असे आढळले की, इशानने मुद्दाम ग्लब्जने बेल्स पाडल्या होत्या. मोठ्या पडद्यावर त्याचे हे कृत्य पाहिल्यानंतर किशन मैदानावरच हसायला लागला. इशान त्याच्या कृत्याबद्दल आयसीसीच्या नियमांनुसार शिक्षा होऊ शकली असती.
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, किशनवर अयोग्य फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, लेव्हल ३च्या गुन्ह्याचा आरोप लावला जाऊ शकत होता. ज्यामध्ये ४ ते १२ वनडे किंवा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे निलंबनाच्या कारवाईचा समावेश आहे.
हेही वाचा – ‘अब्बू, अर्जुन, कितना नसीब वाला है’, सरफराजच्या वडिलांनी सांगितला मुलाचा भावनिक किस्सा
मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी मॅचनंतर इशान किशनशी बातचीत केली. या दरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड देखील उपस्थित होते. परंतु पंच अनिल चौधरी आणि नितीन मेनन यांनी तक्रार न केल्यामुळे त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे भारतीय संघाला मॅच फीच्या ६० टक्के दंडही ठोठावण्यात आला होता.