गुरुवारी दिल्ली क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विराट कोहलीचा मोठा सत्कार करण्यात आला. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानाला, माजी दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचं नाव देण्यात आलं. यावेळी मैदानातील एका पॅव्हेलियन स्टँडला विराट कोहलीचं नाव देण्यात आलं. यावेळी बोलत असताना विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कोहलीने दिल्लीच्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं.
अवश्य वाचा – दिल्लीच्या मैदानावर विराट कोहलीच्या नावाने स्टँड, अनुष्का झाली भावूक
“ज्यावेळी तुम्ही संघाकडून खेळत असता त्यावेळी नेहमी जिंकण्याची जिद्द मनात ठेऊन मैदानात उतरायला हवं. केवळ संघात सहभागी व्हायचंय म्हणून मैदानात उतरलात तर तुमची कामगिरी कधीच सुधारणार नाही. मात्र तुमच्या खेळाशी प्रामाणिक राहिलात तर कोणत्याही स्तरावर चांगला खेळ करु शकता. दिल्लीमध्ये अनेक होतकरु खेळाडू आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते एकदिवस नक्कीच चांगली कामगिरी करु शकतील.” विराट कोहली आपल्या सत्कारानंतर उपस्थित खेळाडूंशी बोलत होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतच वेस्ट इंडिज दौऱ्यावर वर्चस्व राखलं होतं. टी-२०, वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताने यजमान विंडीजला धोबीपछाड दिला. यानंतर भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. १५ सप्टेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.