What Yograj Singh said: भारताचा माजी क्रिकेटपटू, अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील हे त्यांच्या बिनधास्त आणि वादाला निमंत्रण देणाऱ्या विधानांसाठी ओळखले जातात. युवराज सिंगची कारकीर्द लवकर संपण्यासाठी ते धोनीला जबाबदार ठरवत आले आहेत. तसेच त्यांच्या कारकीर्दीबाबत बोलताना ते कपिल देव यांच्यावरही आसूड ओढत असतात. आता त्यांनी युवराज सिंगच्या कर्करोगाबद्दलचा उल्लेख करत “२०११ च्या विश्वचषकादरम्यान त्याचा मृत्यू झाला असता तरी आपल्याला अभिमान वाटला असता”, असे विधान केले आहे.

एका युट्यूब चॅनेलला मुलाखत देत असताना योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा बेधडक विधाने केली आहेत. कपिल देव ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिंदी भाषा ते युवराज सिंगचे आयुष्य यावर ते बिनधास्त व्यक्त होताना दिसत आहेत. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान युवराज सिंगला कर्करोगाचे निदान झाले होते. त्याही वेळेला त्याने धैर्य दाखवत बहारदार खेळी खेळली. मालिकावीर म्हणून त्याचा सन्मान त्यावेळी करण्यात आला होता. या विश्वचषकानंतर युवराजने कर्करोगावर उपचार घेतले. मात्र त्याला पूर्वीसारखा खेळ करण्याची संधी मिळाली नाही.

हे वाचा >> Why Yograj Singh Hates Dhoni: युवराजचे वडील योगराज सिंग धोनी आणि कपिल देवचा इतका द्वेष का करतात? कारण आले समोर?

काय म्हणाले योगराज सिंग?

योगराज सिंग म्हणाले, “त्यावेळी युवराज सिंग कर्करोगाने मरण पावला असता आणि त्याच्यामुळे भारताला विश्वचषक मिळाला असता तर बाप म्हणून मला अभिमानच वाटला असता. मला आजही त्याचा अभिमान वाटतो. हे मी त्याला फोनवरही सांगितले होते. तो रक्ताच्या उलट्या करत असतानाही त्याने खेळावे, अशी माझी इच्छा होती. मी त्याला तेव्हा म्हणालो, तू घाबरू नको, तू मरणार नाहीस. भारतासाठी हा विश्वचषक जिंकून आण”.

भारतीय क्रिकेटमध्ये युवराज सिंगची एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून गणना होत असली तरी योगराज सिंग यांना मात्र त्याने पूर्ण क्षमता दाखवली नसल्याचे वाटते. “युवराजने आपल्या वडिलांप्रमाणे १० टक्के जरी मेहनत घेतली असतील तर आज तो महान क्रिकेटपटू झाला असता”, असेही योगराज सिंग म्हणाले.

२०११ च्या विश्वचषकात काय झाले होते?

२०११ च्या विश्वचषकात युवराज सिंगने ३६२ धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट ८६.१९ एवढा होता. संघाला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. फुफ्फुसाच्या कर्करोगातून बरे झाल्यानंतर २०१९ मध्ये निवृत्ती घेण्यापूर्वी त्याने भारतासाठी काही सामने खेळले.

Story img Loader