पॅरिस : अग्रमानांकित इगा श्वीऑटेकने जपानच्या नाओमी ओसाकावर संघर्षपूर्ण विजय मिळवताना फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का आणि कझाकस्तानच्या एलिना रायबाकिनाने, तर पुरुषांमध्ये इटलीचा यानिक सिन्नेर आणि पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनीही तिसऱ्या फेरीतील स्थान निश्चित केले.
जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या पोलंडच्या श्वीऑटेकने माजी ग्रँडस्लॅम विजेत्या ओसाकावर ७-६ (७-१), १-६, ७-५ असा विजय मिळवला. सामन्यातील पहिला सेट श्वीऑटेकने जिंकला, पण तिला संघर्ष करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये ओसाकाने सहज बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्येही ओसाकाने वर्चस्व मिळवले होते. तिच्याकडे ५-२ अशी मोठी आघाडी होती. मात्र, यावेळी श्वीऑटेकने सलग पाच गेम जिंकत सामना आपल्या नावे केला. सबालेन्काने जपानच्या मोयुका उचिजिमाला ६-२, ६-२ असे सरळ सेटमध्ये नमवत आगेकूच केली. माजी विम्बल्डन विजेत्या रायबाकिनाने नेदरलँड्सच्या अरांतक्सा रसला ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवत तिसऱ्या फेरीत धडक मारली.
हेही वाचा >>> क्रिकेटची खरी मजा ११ खेळाडूंनी खेळण्यातच!; ‘प्रभावी खेळाडू’च्या नियमाबाबत भारताचा यष्टिरक्षकफलंदाज जितेश शर्माचे मत
पुरुष एकेरीत सिन्नेरने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केवर ६-४, ६-२, ६-४ असा विजय मिळवला. मेदवेदेवला मिओमिर केचमानोविचविरुद्ध पुढे चाल मिळाली. मेदवेदेव ६-१, ५-० असा आघाडीवर असताना मिओमिरने सामना मध्येच सोडला. अॅलेक्झांडर झ्वेरेवने डेव्हिड गॉफिनवर ७-६ (७-४), ६-२, ६-२ असा विजय साकारला.
जोकोविचही तिसऱ्या फेरीत
अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपली विजयी लय कायम राखताना फ्रेंच स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या रोबेर्टो कारबालेस बाएनाला ६-४, ६-१, ६-२ अशा फरकाने पराभूत केले. सामन्यातील पहिल्या सेटमध्ये बाएनाने जोकोविचसमोर बाएनाने आव्हान उपस्थित केले. मात्र, या सेटमधील विजयानंतर जोकोविचने अधिकच खेळ उंचावत बाएनावर सहज मात केली.