जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली टेनिसपटू इगा स्वियाटेकने फ्रेंच खुल्या २०२२ महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत अमेरिकेच्या १८ वर्षीय कोको गॉफला ६-१, ६-३ ने मात दिली. इगा स्वियाटेक मूळची पोलंड देशाची असून दिमाखदार कामगिरी करत एक तास आठ मिनिटे चाललेल्या या खेळात तिने निर्विवाद वर्चस्व मिळवले.

हेही वाचा >>> काय सांगता? अवघ्या सात चेंडूत जिंकला टी ट्वेंटी सामना!

इगा स्वियाटेक आणि कोको गॉफ यांच्यात साधारण ६८ मिनिटे लढत झाली. पहिल्या डावात पिछाडीवर गेल्यानंतर दुसऱ्या डावात गॉफने २-० ची आघाडी घेतली. मात्र पुढील डावात खेळात पुनरागमन करत स्वियाटेकने गॉफला धूळ चारली. हा सामना जिंकून गॉफकडे मोठा विक्रम रचण्याची संधी होती. मारिया शारापोवानंतर सर्वात कमी वयात ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याचा मान गॉफला मिळाला असता. मात्र तिचे हे स्वप्न अपुरेच राहिले. स्वियाटेकने गॉफवर ६-१ आणि ६-३ असा विजय मिळवला.

हेही वाचा >>> इंग्लंड दौऱ्यात भारत एकाच दिवशी खेळणार दोन सामने? कसे ते नक्की वाचा…

२१ वर्षीय इगा स्वियाटेकने याआधीही ही स्पर्धा एकदा जिंकली असून ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची तिची ही दुसरी वेळ आहे. २०२० साली तिने विजयी कामगिरी करुन दाखवलेली आहे. तर दुसरीकडे कोको गॉफ फ्रेंच एकेरी खुल्या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती. मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही.