IIT Baba : विराट कोहलीने कितीही जोर लावला तरीही टीम इंडिया जिंकणार नाही, टीम इंडियाचा पराभव होणारच अशी भविष्यवाणी कुंभमेळ्यामुळे चर्चेत आलेल्या आयआयटी बाबाने वर्तवली होती. मात्र या भविष्याचा बार पार फुसका ठरवत टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि या सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतकी खेळीही केली. विराटने केलेल्या उत्तुंग खेळीमुळे टीम इंडिया विजयी झाली. त्याला शुबमन गिल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या या खेळाडूंचीही साथ लाभलीच. टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मीडियासह प्रत्यक्ष मैदानातही जल्लोष पाहण्यास मिळतो आहे. मात्र आयआयटी बाबावर लोक अक्षरशः तुटून पडले आहेत.
दोन दिवसांपूर्वी आयआयटी बाबाने काय भविष्यवाणी केली होती?
दोन दिवसांपूर्वी आयआयटीवाल्या बाबाने भारत पाकिस्तानविरोधात पराभूत होईल, अशी भविष्यवाणी केली होती. विराट कोहलीला म्हणावं कितीही जोर लाव टीम इंडिया पराभूत होणार म्हणजे होणार, असं त्या बाबाने म्हटलं होतं. मात्र, त्याची भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली आहे. टीम इंडियाने निर्विवाद विजय मिळवत त्याची भविष्यवाणी म्हणजे फुसका बार असल्याचं सिद्ध केलं आहे. आता नेटकरी या आयआटी बाबाचा चांगलाच समाचार घेत आहेत.
नेटकरी आयआयटी बाबा विषयी काय म्हणत आहेत?
आज पाकिस्तानपेक्षा जास्त शिव्या या आयआयटी बाबाला पडत आहेत असं एकाने म्हटलं आहे. विराटला नावं ठेवणाऱ्या या बाबाला विराटने शतकी खेळी करुन उत्तर दिलं आहे. आता तुम्ही या बाबाला नेमकं काय म्हणाल? असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे. आयआयटी बाबाने गांजा जरा जास्त ओढला असावा वाटतं असंही काही नेटकरी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर म्हणताना दिसत आहेत. आयआयटी बाबा पाखंडी आहे असंही काहीजण म्हणत त्याला ट्रोल करत आहेत. आयआयटी बाबाने जे सांगितलं त्याला म्हणतात आपल्या हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेणं असंही काही लोक म्हणत आहेत.
टीम इंडियाचा पाकिस्तानवर शानदार विजय
विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे.
विराटने ७ चौकारांसह नाबाद शतकी खेळी केली
विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा २४२ धावांचे लक्ष्य कोणत्याही अडचणीशिवाय जबरदस्त पद्धतीने पूर्ण केले. टीम इंडियाच्या या विजयाचा स्टार विराट कोहली होता, ज्याने उत्कृष्ट शतक झळकावून आपल्या पुनरागमनाचा डंकाही वाजवला आहे.