कॅरेबियन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळू इच्छिणारा भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या अडचणीत सापडला आहे. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याच्या आधीच इरफानने कॅरेबियन प्रिमीअर लिग स्पर्धेच्या लिलावासाठी आपलं नाव पुढे केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्यानेच इरफानला या लीगसाठी आपलं नाव देण्याचा सल्ला दिला होता. मात्र बीसीसीआयच्या नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याशिवाय खेळाडू इतर देशातील टी-२० स्पर्धेत खेळू शकत नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इरफानला कॅरेबियन क्रिकेट लिगच्या लिलावात आपलं नाव देण्यास सांगितलं. या स्पर्धेत त्याची निवड झाली तर इरफानला Backdated retirement जाहीर करण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र हा पर्याय बीसीसीआयच्या नियमांना धरुन आहे की नाही याबाबत स्पष्टता नाहीये. त्यामुळे इरफानला चुकीचा सल्ला दिला गेला असल्याचं बोललं जातंय.

अवश्य वाचा – आनंदाची बातमी ! केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त

यावेळी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका अधिकाऱ्याने नाव न घेता, क्रिकेट प्रशासकीय समितीच्या कारभारावर टीका केली. प्रशासकीय समितीलाच आपल्या कामाची आणि अधिकारांची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. इरफान पठाणला गेल्या ३ हंगामांमध्ये आयपीएलमध्ये कोणत्याही संघमालकाने विकत घेतलं नाहीये. मात्र निवृत्ती जाहीर न करता कॅरेबियन लीगमध्ये नाव देण्यामुळे इरफान अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे इरफान पठाणला कोणत्या अधिकाऱ्याने सल्ला दिला हा प्रश्न उभा राहिला आहे.

मुळचा बडोद्याचा असलेला इरफान पठाण सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीर संघाकडून खेळतो. आयपीएलमध्येही इरफानने पुणे, गुजरात यांसारख्या संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. दरम्यान या प्रकाराबद्दल प्रतिक्रीयेसाठी इरफान पठाणशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याने यावर काहीही न बोलणं पसंत केलं आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणातत नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकाआधी हिटमॅन सपत्नीक मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर

Story img Loader