सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश हे माझ्यासाठी सन्मानजनक आणि आनंददायी आहेत, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. गावस्कर यांनी एन. श्रीनिवासन यांच्या जागी बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळावे, असे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या प्रस्तावात म्हटले  आहे.
‘‘देशातील सर्वोच्च न्यायालयाने एखादी गोष्ट सूचित केली की त्यांचे आपल्याला पालन करावे लागते. परंतु सध्या मी समालोचक म्हणून बीसीसीआयशी करारबद्ध आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाला मी बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळावे, असे वाटत असेल, तर ते मी आनंदाने सांभाळेन,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.
‘‘जेव्हा सर्वोच्च न्यायालय तुम्हाला विचारणा करते, तेव्हा तुमच्यापुढे पर्याय नसतो. त्यांनी माझ्यापुढे जो प्रस्ताव ठेवला आहे, तो मी आनंदाने स्वीकारेन. या पदाला मी पुरेसा न्याय देऊ शकेन, असे सर्वोच्च न्यायालयाला वाटत असेल तर तो माझा मोठा सन्मान आहे. परंतु शुक्रवापर्यंत आपल्याला वाट पाहायला हवी. कारण याबाबतचे निर्देश शुक्रवारी दिले जाणार आहेत,’’ असे ते म्हणाले. या आव्हानासाठी तुम्ही सज्ज आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना गावस्कर म्हणाले की, ‘‘एक सलामीवीर फलंदाज म्हणून तुम्हाला सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागते. सर्व प्रकारच्या खेळपट्टय़ांवर तुम्हाला खेळता यायला हवे. तुम्हाला सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक आव्हानांशी सामना करण्यास सज्ज राहावे लागते.’’
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना सट्टेबाजी आणि मॅच-फिक्सिंग संदर्भातील खटला चालू असेपर्यंत निलंबित करण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावात म्हटले आहे. याविषयी गावस्कर म्हणाले, ‘‘हे दुर्दैवी आहे. ते आयपीएल विजेते संघ आहेत. २००८मध्ये राजस्थान रॉयल्सने तर तीन वेळा चेन्नई सुपर किंग्जने जेतेपद प्राप्त केले आहे. त्यांनी आपल्या खेळाद्वारे क्रिकेटरसिकांना निखळ आनंद दिला आहे. परंतु त्यांच्या निलंबनामुळे क्रिकेटरसिक दु:खी होतील.’’
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आयपीएलचे शुद्धीकरण होईपर्यंत स्पर्धा बंद करण्याची मागणी केली होती. याबाबत गावस्कर यांनी सांगितले की, ‘‘अशा परिस्थितीत वेगळ्या पद्धतीने विचार करायचा असतो. स्पर्धा बंद करून त्याचा कितपत फायदा होईल, असे मला वाटत नाही. १४ वर्षांपूर्वी जेव्हा फिक्सिंग प्रकरण बाहेर आले, तेव्हासुद्धा क्रिकेट चालू होते.’’
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरसुद्धा श्रीनिवासन पद सोडण्यास तयार नाहीत, याबाबत आपले मत प्रकट करताना गावस्कर म्हणाले की, ‘‘आरोप सिद्ध होईपर्यंत प्रत्येक जण प्रामाणिक असतो, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे.’’

Story img Loader