एक छायाचित्र शेकडो शब्दांपेक्षाही जास्त बोलतं, असं म्हटलं जातं, पण जेव्हा छायाचित्रंच मिळत नाहीत तेव्हा काय करायचं, याचा उत्तम वस्तुपाठ ऑस्ट्रेलियातील ‘हेराल्ड सन’ या प्रतिथयश वृत्तपत्राने दाखवून दिला आहे. बाजूच्या चित्रप्रतिमा पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की, क्रिकेटची माहिती देणाऱ्या वृत्तांसाठी या चित्रप्रतिमा का वापरण्यात आल्या आहेत? पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना छायाचित्रांसाठी परवानगी नाकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वृत्तसंस्थांनीही या मालिकेतील छायाचित्रांसाठी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. पण बातमीसोबत छायाचित्र तर जायला हवे. परंतु  करायचे काय, हा प्रश्न ऑस्ट्रेलियातील वृत्तसंस्थांना पडला होता. यावर ‘हेराल्ड सन’ने शक्कल लढवत चित्रप्रतिमांचा वापर केला आणि त्यांचा हा प्रयोग लोकांना चांगलाच आवडला.
यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या वेळीही बीसीसीआयने परदेशी वृत्तसंस्थांना छायाचित्रांसाठी परवानगी नाकारली होती, तोच पवित्रा त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या वेळीही कायम ठेवला. ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांना ‘गेट्टी इमेज’ ही वृत्तसंस्था छायाचित्र पुरवते, पण बीसीसीआयने त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील छायाचित्रांवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली.
‘हेराल्ड सन’ या वृत्तपत्राने छायाप्रतिमा प्रसिद्ध करत एका बाजूने वाचकांची सहानुभूती मिळवली असली तरी दुसरीकडे क्रिकेटविश्वाला दखलही घ्यायला लावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) यामध्ये दखल घालून ही समस्या सोडवावी, अशी ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांची मागणी आहे. ‘हेराल्ड सन’ने प्रसिद्ध केलेल्या या छायाप्रतिमांमुळे आयसीसीलादेखील या प्रकरणाची दखल घ्यावी लागेल.
बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था यांच्यातील वादाच्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांना सध्या चेन्नईत सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यांच्या छायाचित्रे वापरता येत नाहीत. परंतु ‘हेराल्ड सन’ या ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य दैनिकाने या चित्रप्रतिमांची आगळी शक्कल लढवत सामन्याचे क्षण बोलके केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा