धरमशाला : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतून रोहित शर्माच्या नेतृत्व शैलीची जगाला ओळख पटली आणि अनेक खेळाडू त्याच्या नेतृत्व शैलीने प्रभावित झाले, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले.
रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना अगदी पहिल्या सामन्यापासून भारताने एकदाही मोठे दावे केले नाहीत. इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्ससारखी आक्रमकताही दाखवली नाही. कमालीच्या शांतपणे सर्व खेळाडूंना बरोबर घेऊन जात रोहितने भारताला मालिकेत ४-१ असा विजय मिळवून दिला. ‘‘मी एका सर्वोत्तम संघाबरोबर काम करत आहे. मी त्यांच्याकडून सातत्याने शिकत असतो. रोहितसोबत काम करणे अप्रतिम आहे. तो एक सर्वोत्तम कर्णधार आहे. याचमुळे खेळाडू त्याच्याकडे आकर्षित होतात,’’ असे द्रविड म्हणाले.
हेही वाचा >>>मुंबई इंडियन्सच्या नव्या गोलंदाजाची टी-२० मध्ये हॅटट्रिक, IPL पूर्वीच केला धमाका
‘‘ही मालिका अनेक चमकदार क्षणांची साक्षीदार आहे. या मालिकेतून ऑफ-स्पिनर अश्विनचे पुनरागमन झाले आणि ते वैशिष्टय़पूर्ण ठरले. अश्विन पुनरागमनासाठी आणि संघासाठी आपले योगदान देण्यासाठी उत्सुक होता. हे त्याने सिद्ध केले,’’असे द्रविड यांनी सांगितले.
द्रविड यांनी संघ भावना आणि ड्रेसिंग रुममधील वातावरणाचे कौतुक केले. द्रविड म्हणाले,‘‘भारतीय संघामध्ये जे वातावरण सध्या निर्माण झाले आहे, ते महत्त्वाचे आहे. सर्व खेळाडू एकमेकांच्या खूप जवळ आहे. त्यामुळे जी सांघिक भावना निर्माण झाली, ती पाहून प्रशिक्षक म्हणून मी खूप आनंदी आहे.’’