दिलीप ठाकूर
प्रेमाला तसा लिखित वा अलिखित नियम नाही. कोणीही कोणाच्याही प्रेमात पडू शकतो. काहींच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होते तर अनेकांची ‘अधुरी एक कहाणी’ होते. पण सगळ्याच गोष्टी येथे संपत नाहीत. काही आणखीन वेगळे रंग दाखवायला सुरुवात करतात.

मनोरंजन आणि क्रीडा जगतातदेखील असे अनेक किस्से आहेत.  यातदेखील सर्वात जास्त लक्ष कोणत्या दोन गोष्टींवर केंद्रित होत  असेल तर ते म्हणजे बॉलिवूड आणि क्रिकेट. क्रिकेटर्स आणि बॉलिवूडच्या अफेअर्सच्या कहाण्या काही नवीन नाहीत. त्यांच्या ‘लव्ह स्टोरीज्’ अनेकजणांच्या तोंडी असतात. अनेक क्रिकेटर्स अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आहेत. काहींच्या प्रेमप्रकरणाने गोडवा कायम ठेवला, तर काही क्रिकेटपटूंची प्रेमकथा वेगळ्या वाटेने गेली.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान हे रुबाबदार आणि वादळी व्यक्तिमत्व. तो ऐंशी-नव्वदच्या दशकातील सर्वात हँडसम क्रिकेटर म्हणून ओळखला जाई. इम्रान भारताच्या दौर्‍यावर आला की त्याच्या स्वींग गोलंदाजीइतकीच त्याच्या सेक्स अपीलचीही चर्चा रंगे. इतकी की त्याचे झीनत अमानशी नाव जोडले गेले. कोणत्या तरी पार्टीतील त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि खमंग फोडणी देऊन चर्चेला खाद्य मिळालं. त्यांचे हे नाते गॉसिपपुरतेच मर्यादीत राहिले. इम्रान खानची घटस्फोटित पत्नी रेहम खानने एक पुस्तक लिहिले असून, या पुस्तकात तिने इम्रानवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्याची पाच अनौरस मुलं असून, यातील काही भारतातील असल्याचा दावा तिने केला आहे. इम्रान होमोसेक्सुअल असल्याचेदेखील तिने या पुस्तकात म्हटले आहे. रेहमने फक्त इम्रान खानच नव्हे तर वसिम अक्रमवरही गंभीर आरोप केले आहेत. वसिमने रेहम खानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

क्रिकेटविश्व आणि ग्लॅमरची ही अशी जवळीक अनेकवेळा पाहायला मिळते. कधी त्यात देशाच्याही सीमा अथवा ब्राउंडी लाईन ओलांडून पलीकडे जाऊन अशी नाती निर्माण झाली. अंजू महिन्द्रु राजेश खन्नाची गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जात असतानाच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू गॅरी सोबर्स याचीही छान मैत्रीण म्हणून गॉसिप मॅगझिनमधून फार गाजली. हे रिलेशन इतक्यावरच थांबले पण त्याच वेस्ट इंडिजचा घणाघाती फलंदाज विवियन रिचर्डने इतक्यावरच डाव घोषित केला नाही. त्याचे नीना गुप्ता हिच्याशी जुळलेल्या नात्यामधून मसाबा या मुलीचा जन्म झाला. आज मसाबा नामंवत फॅशन डिझायनर  आहे. हे लग्नाशिवाय विश्वासाचे नाते आहे.

मोहसीन खानची गोष्ट यापेक्षा वेगळी. तो भारतात क्रिकेट खेळायला आला आणि त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत चक्क हिरोगिरी सुरू केली. आपल्या करिअरच्या उच्च स्थानी असताना रीना रॉय आणि मोहसिन खान यांनी १९८३ मध्ये लग्न केले. घाई गडबडीत झालेलं हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. दोघांनीही घटस्फोट घेऊन आपले मार्ग वेगळे केले. ‘गुनहगार कौन’, ‘बटवारा’ अशा काही चित्रपटात भूमिका करताना रिना रॉय मोहसीनच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झाली आणि तिने मोहसीनसोबतच्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवली. आपल्या लग्नाची तिने आम्हा सिनेपत्रकाराना छान पार्टीदेखील दिली होती. लग्नानंतर ती पाकिस्तानला गेली पण दुर्दैवाने सुखी झाली नाही. काही काळातच ती घटस्फोट घेऊन भारतात परतली.

क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यात कधी सुखी संसार याची आपल्याकडे उदाहरणे अनेक. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांची प्रेमकथाही तशी रंजकच आहे. १९६५ मध्ये एका मित्राच्या पार्टीत या दोघांची ओळख झाली आणि एकमेकांना पाहताचक्षणी ते प्रेमात पडले होते. चार वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहली अनुष्का शर्मा, हरभजनसिंग व गीता बसरा, झहीर खान व सागरिका घाटगे, युवराज सिंग व हेजल ही हिट लिस्ट वाढत जाईल हे चांगले आहे.

महमद अझरुद्दीनने संगीता बिजलानीशी लग्न करताना आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. या प्रेम प्रकरणात संगीता चक्क भारतीय क्रिकेट संघातील जणू एक सहकारी होती अशी चर्चा गाजली. १९९४ मध्ये एका जाहिरातीदरम्यान संगीता बिजलानी आणि मोहम्मद अजरुद्दीन यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्नही केले. पण लग्नाच्या अनेक वर्षांनी दोघांचे मार्ग वेगळे झाले.

तर क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्या ‘कुछ तो है’ अशादेखील जोड्या अनेक. पण त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. एस. व्यंकट राघवन-हेमा मालिनी, रवि शास्त्री-अमृता सिंग, सौरभ गांगुली-नगमा (सौरभच्या पत्नीने पटकन धावत येऊन पतीची विकेट वाचवली म्हणे) वगैरे वगैरे काही गंभीर तर काही गंमतिशीर.

‘तो मैदानावरचा रांगडा गडी आणि ती चंदेरी दुनियेतील चांदणी’ यांच्या प्रेमकथांचा सिलसिला असाच सुरू राहीला तर नवल वाटायला नको.

Story img Loader