पाकिस्तानचे माजी फिरकीपटू अब्दुल कादिर यांच्याकडून रवी शास्त्री यांच्या मताला दुजोरा
कराची : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार व विद्यमान पंतप्रधान इम्रान खान या दोघांच्या नेतृत्वगुणात मला साम्य दिसते. दोघेही आघाडीवर राहून संघाला प्रेरणा देतात, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू अब्दुल कादिर यांनी कोहलीच्या नेतृत्वगुणाची प्रशंसा केली.
‘‘कोहली हा फलंदाज आणि कर्णधार म्हणून काही चांगले करतो आणि मग संघाकडूनही तशीच अपेक्षा बाळगतो. हाच गुण इम्रान यांचादेखील असल्याने मला त्या दोघांमध्ये साम्य वाटते,’’ असे कादिर यांनी नमूद केले. रवी शास्त्री यांनीही इम्रान आणि कोहली यांच्यात काही समानता असल्याचे विधान केल्याच्या पाश्र्वभूमीवर कादिर यांना विचारणा करण्यात आली.
ते म्हणाले, ‘‘कोहली हा त्याच्या कामाची जबाबदारी घेऊन खेळ करतो आणि मग इतरांनाही चांगला खेळ करण्यास प्रवृत्त करतो. खेळाडूंकडून चांगला खेळ करवून घेणे हे इम्रानचे वैशिष्टय़ होते. त्या स्तरावर अद्याप कोहली पोहोचलेला नाही. पण स्वकर्तृत्वाने चांगला आदर्श घालून देऊन इतरांना त्यानुसार खेळ करण्यासाठी तो निश्चितपणे प्रवृत्त करतो.’’
कादिर यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण ६७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात कसोटीत २३६ तर एकदिवसीय सामन्यांमध्ये १३२ बळी मिळवले असून बहुतांश सामने हे इम्रानच्या नेतृत्वाखालीच खेळले आहेत. यापूर्वी रवी शास्त्री यांनीदेखील विराटसारखा कर्णधार भारताला लाभला असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. तसेच विराट आणि इम्रान खान यांच्यात अनेक बाबतीत साम्य आहे, असे मत व्यक्त केले होते.दोघेही आघाडीवर राहून संघाला चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित करीत असल्याचे शास्त्री यांनी म्हटले होते.