मी माझा चांगला मित्र आणि देशाची उत्तम सेवा करणारा क्रिकेटपटू गमावला, अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांनी महान फिरकी गोलंदाज अब्दुल कादीर यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना प्रकट केल्या.

लाहोर येथे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने कादीर यांचे निधन झाले. १५ सप्टेंबरला ते वयाची ६४ वर्षे पूर्ण करणार होते.

‘‘ही वाईट बातमी आत्ताच कळली. क्रिकेटमधील लेग-स्पिनच्या जादूचे श्रेय हे कादीर यांनाच द्यायला हवे. त्यामुळेच पुढील पिढय़ांना प्रेरणा मिळाली,’’ असे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.

‘‘कादीर यांच्या गोलंदाजीचा आत्मविश्वासाने मी सामना केला होता. त्या आठवणी आजसुद्धा ताज्या आहेत. एक सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी ते एक होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे,’’ असे सचिन तेंडुलकरने ‘ट्विटर’वर म्हटले आहे. फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही ‘ट्विटर’द्वारे कादीर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘‘पाकिस्तानचे माजी फिरकी गोलंदाज कादीर यांच्या निधनाचे वृत्त समजले, तेव्हा अत्यंत दु:ख झाले.’’

Story img Loader