Muttiah Muralitharan on Dhoni: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर झाले असून आता स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी फक्त तीन महिने बाकी आहेत. २७ जून रोजी, आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन हे दोन दिग्गज खेळाडू उपस्थित होते.
श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुरलीधरनने २०११च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्याबद्दल असा खुलासा केला आहे, ज्याबद्दल तो यापूर्वी कधीही बोलला नव्हता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने युवराज सिंगच्या पुढे चौथ्या क्रमांकावर स्वतः ला प्रमोट केले आणि शेवटपर्यंत नाबाद राहून भारताला विश्वचषक जिंकवून दिला.
आयसीसीच्या त्या कार्यक्रमात बोलताना मुथय्या मुरलीधरनने भारत विरुद्ध श्रीलंका विश्वचषक २०११च्या अंतिम सामन्यातील एका घटनेची आठवण करून दिली. मुरलीधरनने हे उघड केले की त्याला माहित होते, “एम.एस. धोनी युवराज सिंगच्या आधी फलंदाजीला येईल.” श्रीलंकेच्या दिग्गज फिरकीपटूने तो क्षण आठवला जेव्हा संपूर्ण आयकॉनिक वानखेडे स्टेडियम एम.एस. धोनीला युवराज सिंगच्या पुढे मैदानात जाताना पाहून आश्चर्यचकित झाले होते.
महेंद्रसिंग धोनीचा आयकॉनिक सिक्स कोणीही विसरू शकणार नाही
भारताचा माजी कर्णधार धोनीने षटकार मारून भारताला दुसरे विजेतेपद मिळवून दिले. त्याक्षणी स्टेडियममध्ये जो एकच जल्लोष झाला तो कोणीही विसरू शकत नाही. माहीचा तो षटकार आजही देश विसरलेला नाही. २०११च्या विश्वचषक फायनलमध्ये धोनीने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ९१ धावांची खेळी केली होती. त्याच सलामीवीर गौतम गंभीरने ९७ धावांची शानदार खेळी केली होती.
मुथय्या मुरलीधरनला माहित होते की धोनी युवराज सिंगआधी फलंदाजीला येईल
दरम्यान, श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुरलीधरनने आयसीसीच्या संवाद सत्रात खुलासा केला की, “मला वाटत होतेच की मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू युवराज सिंगआधी टीम इंडियाचा कर्णधार धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. कारण, माहीला माझ्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा हे माहित होते. त्याचवेळी एक डावखुरा फलंदाज गौतम गंभीर तिथे खेळत होता.”
माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन या कार्यक्रमात म्हणाला “मला माहित होते की धोनी प्रथम फलंदाजीला येईल, कारण युवराज सिंग माझ्या गोलंदाजीसमोर खेळण्यास थोडा मानसिकरित्या तयार नव्हता. त्या विश्वचषकात युवराज सर्वोत्तम खेळाडू होता, त्याने मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर जबरदस्त कामगिरी केली. मात्र, मला माहीत होते की धोनी अंतिम फेरीत त्याच्याआधी फलंदाजी करेल कारण त्याने माझ्याविरुद्ध नेटमध्ये खूप फलंदाजी केली होती.”
पुढे बोलताना दिग्गज फिरकीपटू म्हणाला की, “आम्ही आयपीएलमध्ये सीएसकेसाठी एकत्र खेळत होतो, त्यामुळे मी त्याच्याविरुद्ध नेटमध्ये खूप गोलंदाजी केली. माझ्याविरुद्ध कसे खेळायचे हे धोनीला चांगलेच माहीत होते. त्यामुळे विराट कोहली बाद झाल्यावर स्वत:ला प्रमोट करू, असा धोनीचा विचार होता. आम्ही त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला पण तो दिवस भारताचा होता.”