Mohammed Siraj and Mohammed Shami Interview:मुंबईत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वनडे ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हतबल झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ ३५.४ षटकांत १८८ धावांत गारद झाला. मिचेल मार्श (८१) वगळता एकाही खेळाडूला ३० चा आकडा पार करता आला नाही. सामन्यानंतर शमीने सिराजला एक महत्वाचा सल्ला दिला.
या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी तीन बळी घेतले. सिराजने ५.४ षटकांत २९ धावा तर शमीने ६ षटकांत १७ धावा दिल्या. सिराजने एक आणि शमीने दोन निर्धाव षटके टाकली.
मुंबई वनडेनंतर सिराज आणि शमीची बीसीसीआय टीव्हीवर मुलाखत झाली, ज्यामध्ये दोघांनी अनेक पैलूंवर चर्चा केली. त्याचवेळी सिराजने सांगितले की, तो फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहता असल्याने तो उडी मारून विकेटचे सेलिब्रेशन करतो. मात्र, सिराजला त्याच्या सेलिब्रेशन स्टाईलबाबत शमीकडून इशाराही मिळाला आहे.
वास्तविक, शमीने सिराजला प्रश्न विचारला की, तुझ्या सेलिब्रेशनचे रहस्य काय आहे? यावर सिराज म्हणाला, माझा सेलिब्रेशन साधे आहे. मी रोनाल्डोला फॉलो करतो. मी त्याचा चाहता आहे. म्हणूनच मी त्याच्यासारखे सेलिब्रेशन करतो. जेव्हा एखादा फलंदाज बोल्ड होतो, तेव्हाच मी असे सेलिब्रेशन करतो. फाइन लेग वगैरेवर झेलबाद झाल्यास, मी उडी मारून सेलिब्रेट करत नाही.” हे ऐकल्यानंतर शमी म्हणतो, “एक सल्ला आहे. तुम्ही कोणाचे तरी चाहते आहात हे चांगले आहे, पण वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही अशा उड्यांपासून दूर राहिले पाहिजे.” कारण बऱ्याचवेळा अशा गोष्टींमुळे वेगवान गोलंदाजांना दुखापत होऊ शकते.
हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: केएल राहुलवर टीका करणाऱ्या माजी खेळाडूने आता केला सलाम; म्हणाला, ‘दबावात संयमाची…’
विशेष म्हणजे पहिल्या वनडेत सिराजने ट्रॅव्हिस हेड (५), शॉन अॅबॉट (०) आणि अॅडम झाम्पा (०) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने हेड सोडून दुसऱ्या फलंदाजांना झेलबाद केले. सिराजने दुसऱ्या षटकाचा शेवटच्या चेंडूलर हेडला बोल्ड केले आणि रोनाल्डो स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले.