Ashes 2023: रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दोन विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २८१ धावांची गरज होती, उस्मान ख्वाजा आणि पॅट कमिन्सच्या शानदार खेळीच्या जोरावर ८ विकेट्स गमावून त्यांनी विजय साकारला. यासह ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेसमध्ये १-० अशी आघाडी घेतली. एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २ विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी ८ गडी गमावून पूर्ण केले. पॅट कमिन्सने नाबाद ४० आणि लियॉनने १६ धावा केल्या. त्याने नॅथन लिऑनसोबत ९व्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून इंग्लंडचा विजय हिरावून घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅट कमिन्सची सामना जिंकवणारी खेळी

ऑस्ट्रेलियाने २२७ धावांवर आपली ८वी विकेट गमावली होती. अ‍ॅलेक्स कॅरीला जो रूटने त्याच्याच चेंडूवर उत्कृष्ट झेल घेत पॅव्हेलियनमध्ये पाठवले, पण ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स काही वेगळाच विचार करून आला होता. त्याने नॅथन लियॉनसह ९व्या विकेटसाठी नाबाद ५५ धावा जोडल्या आणि आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. कमिन्सने नाबाद ४० धावा केल्या.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावा असताना दिवसाची सुरुवात केली. ख्वाजा आणि नाईट वॉचमन म्हणून आलेल्या स्कॉट बोलँड यांनी डाव पुढे नेला. स्टुअर्ट ब्रॉडने दिवसाच्या आठव्या षटकात बोलंडला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून ही भागीदारी मोडली. बोलंडने कारकिर्दीतील सर्वोत्तम २० धावांची खेळी केली. फॉर्ममध्ये असलेला ट्रॅव्हिस हेडही फार काळ टिकू शकला नाही आणि त्याने केवळ १६ धावा केल्या आणि ऑफस्पिनर मोईन अलीच्या चेंडूवर जो रूटच्या हाती झेल देत बाद झाला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पाच बाद १४३ अशी अवस्था झाली.

ख्वाजा आणि ग्रीन यांनी मात्र चहापानाच्या ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाला आणखी धक्का बसू दिला नाही. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या, मात्र रॉबिन्सनने २८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर ग्रीनला त्याच्या चेंडूवर बाद होण्यास भाग पाडले आणि ही भागीदारी तोडली. ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजाच्या रूपाने सर्वात मोठा धक्का बसला. ख्वाजाला बेन स्टोक्सने वैयक्तिक ६५ धावांवर धावबाद केले. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा अॅलेक्स कॅरीही केवळ १८ धावांची भर घालून बाद झाला. त्याला जो रूटने शानदार झेल घेत’बाद केले.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

पहिल्या डावात जो रूटच्या शानदार ११८ आणि जॉनी बेअरस्टोच्या ७८ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ८ बाद २९३ धावा करून डाव घोषित केला होता. या दोघांशिवाय जॅक क्रॉलीने ६१ धावा केल्या. २९३ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाच्या १४१ धावा आणि अॅलेक्स कॅरीच्या ६६ धावांच्या जोरावर २८६ धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंडने ७ धावांची आघाडी घेतली. या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली रॉबिन्सन यांनी ३-३ विकेट्स घेतल्या.

इंग्लंडचा दुसरा डाव

गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात पुनरागमन केले. पॅट कमिन्स आणि नॅथन लायनच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा दुसरा डाव २७३ धावांवर आटोपला. दोघांनी मिळून ८ विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात जो रुट आणि ब्रूक यांनी प्रत्येकी ४६ धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. शतकवीर उस्मान ख्वाजाला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ashes 2023 pat cummins played captains innings due to which australia beat england by 2 wickets in thriller match avw