आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना युएईमध्ये आल्यानंतर पुन्हा ६ दिवस क्वारंटाइन होण्याची गरज नसल्याची माहिती RCB चे चेअरमन संजीव चुरीवाला यांनी दिली आहे. आयपीएल सुरु होण्याआधी काही दिवस इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मर्यादीत षटकांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत सहभागी होणार असल्यामुळे ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे काही खेळाडू आयपीएलमध्ये सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. परंतू या कालावधीदरम्यान ते स्वतः Bio Secure Bubble मध्ये असणार आहेत, यासाठी त्यांना पुन्हा ६ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीची गरज नसल्याचं चुरीवाला यांनी सांगितलं.
RCB च्या संघात फिंच आणि मोईन अली दे दोन खेळाडू काही कालावधीने सहभागी होतील. ४ ते १६ सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा रंगणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे इंग्लंडचे आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १७ सप्टेंबरपर्यंत युएईमध्ये पोहचू शकतात आणि आपापल्या संघाकडून ते पहिला सामन्यात खेळू शकतात असंही मत चुरीवाला यांनी व्यक्त केलं. “हे खेळाडू आधीपासूनच Bio Secure Bubble मध्ये असणार आहेत त्यामुळे आम्ही त्यांना युएईत तात्काळ दाखल होण्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय करु शकतो. पण युएईत आल्यानंतर त्यांना आपली करोना चाचणी करुन घ्यावी लागेल. या बाबतमीत नियमांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही.”
अवश्य वाचा – IPL 2020 : युजवेंद्र चहलने सांगितलं RCB च्या खराब कामगिरीचं कारण…
संघातील सर्व खेळाडूंसाठी युएईत राहण्याची खास व्यवस्था करण्यात आल्यापासून इकडे खेळाडूंना सराव आणि आपला फिटनेस कायम राखण्यासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा युएईत रंगणार आहे.