पंडय़ाचे नाबाद अर्धशतक; विदर्भावर सहा विकेट्सने मात
सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बडोद्याचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ा ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरला. त्याच्या धडाकेबाज नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर बडोद्याने विदर्भावर सहा विकेट्स राखून मात केली. वानखेडेवर झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने १६२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा बडोद्याने यशस्वीरीत्या पाठलाग करत बाद फेरीतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला.
बडोद्याने नाणेफेक जिंकत विदर्भाला फलंदाजीसाठी पाचारण केले. विदर्भाला १७ धावांवर पहिला धक्का बसला. पण त्यानंतर गणेश सतीश आणि जितेश शर्मा (३५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचत संघाला स्थिरस्थावर केले. जितेश आणि गणेश ठरावीक फरकाने बाद झाल्यावर विदर्भाचा संघ अडचणीत सापडला होता.
गणेशने ३१ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर अपूर्व वानखेडेने तडफदार खेळी साकारल्यामुळे विदर्भाला दीडशे धावांची वेस ओलांडता आली. अपूर्वने २४ चेंडूंमध्ये एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४० धावांची खेळी केली. विदर्भाच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बडोद्याची सुरुवात आश्वासक झाली नव्हती. पण हार्दिकने विदर्भाच्या गोलंदाजांचा समाचार घेत बडोद्याच्या बाजूने सामना झुकवला. या खेळीत हार्दिकने अप्रतिम फटक्यांची मेजवानी चाहत्यांना दिली. ४६ चेंडूंमध्ये त्याने ३ चौकार आणि तब्बल आठ षटकार लगावत त्याने नाबाद ८६ धावांची खेळी साकारली. हार्दिकने १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लाँग ऑनवर षटकार खेचत दिमाखदारपणे संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ : २० षटकांत ५ बाद १६२ (गणेश सतीश ५४, अपूर्व वानखेडे ४०; स्वप्निल सिंग २/४१) पराभूत वि. बडोदा : १९ षटकांत ४ बाद १६८ (हार्दिक पंडय़ा नाबाद ८६; रवी जांगिड २/३६).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा