India vs West Indies 2nd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना वेस्ट इंडिजने सहा विकेट्स राखून जिंकला. यासह कॅरेबियन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारताने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजसमोर १८१ धावा केल्या. वेस्ट इंडिजने चार विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या आणि सामना जिंकला. भारताने हा सामना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत खेळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर सहा विकेट्सने मात केली. यासह कॅरेबियन संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. केसी कार्टीने हार्दिकच्या षटकात लागोपाठ दोन चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ४०.५ षटकात १८१ धावा केल्या. वेस्ट इंडिजने ३६.४ षटकांत चार गडी गमावून १८२ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. शाई होपने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली त्याने नाबाद ६३ धावा केल्या. तसेच केसी कार्टी ४८ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून शार्दुल ठाकूरला तीन विकेट्स घेण्यात यश मिळाले.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १८१ धावांवर आटोपला. टीम इंडिया केवळ ४०.५ षटके खेळू शकली आणि वेस्ट इंडिजसमोर मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक ५५ धावा केल्या. शुबमन गिल ३४ आणि सूर्यकुमार यादव २४ धावा करून बाद झाले. जडेजाने १० आणि शार्दुलने १६ धावा केल्या. याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ० आणि ९ धावांच्या दरम्यान सहा फलंदाज बाद झाले. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. अल्झारी जोसेफला दोन, कारिया आणि सेल्सला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळाले.

हेही वाचा: Ashes 2023: बेअरस्टोने स्टोक्सशी तर ब्रॉडने अँडरसनची घातली जर्सी, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी असे का केले? जाणून घ्या

वेस्ट इंडिजसाठी जरी १८२ धावांचे लक्ष्य फार मोठे नसले, तरी या खेळपट्टीवर हे लक्ष्य गाठणे सोपे नव्हते. त्यांच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या ११४ धावांवर गारद झाला होता. मात्र या सामन्यात त्यांनी करून दाखवले आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी त्रिनिदादमध्ये होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ind vs wi 2nd odi team india failed miserably on both fronts west indies beat india by six wickets to level the series 1 1 avw