भारतावर ५ बळी राखून विजय; मोहम्मद हफिझ आणि शोएब मलिक यांची झुंजार अर्धशतके
भेदक गोलंदाजी आणि तीन बिनीचे फलंदाज स्वस्तात गमावल्यावर कर्णधार मोहम्मद हफिझ व शोएब मलिक यांनी फटकावलेल्या झुंजार अर्धशतकांच्या जोरावर रोमहर्षक सामन्यात भारतापेक्षा पाकिस्तानचा संघ सरस ठरला. भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करूनही अन्य फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे नतमस्तक झाल्याने संघाला १३३ धावांवर समाधान मानावे लागले. पदार्पण करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानला सुरुवातीला तीन हादरे दिले, पण त्यानंतर हफिझ आणि मलिक यांनी तडफदार खेळ करत संघाला पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या डावाला स्थैर्य मिळवून देत विजयाच्या वाटेवर नेणाऱ्या हफिझला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
१३४ धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला खरा, पण स्थानिक सामन्यात सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा शून्यावर बाद केलेल्या भुवनेश्वरने पाकिस्तानची ३ बाद १२ अशी दयनीय अवस्था केली होती. पण त्यानंतर मात्र हफिझ आणि मलिक यांनी चौथ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी रचत संघाला विजयासमीप नेले. इशांत शर्माने यावेळी हफिझला झेलबाद करत त्याचा काटा काढला, बाद होण्यापूर्वी हफिझने ४४ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकांच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली. हफिझ बाद झाल्यावर भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न ठेवला आणि अखेरच्या षटकांत पाकिस्तानला १० धावांची गरज होती. रवींद्र जडेजाच्या अखेरच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर पाकिस्तानला चार धावा घेता आल्या, पण चौथ्या चेंडूवर स्थिरस्थावर झालेल्या मलिकने षटकार ठोकत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सलामीवीरांच्या चांगल्या सुरुवातीनंतरही भारताला पहिल्यांदा फलंदाजी करताना १३३ धावांवरच समाधान मानावे लागले. गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे यांनी ७७ धावांची सलामी दिली खरी, पण हे दोघे बाद झाल्यावर अन्य फलंदाजांनी मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. उमर गुल आणि सईद अजमल यांनी भेदक मारा करत भारताच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या दोन्ही षटकांमध्ये भारताच्या सलामीवीरांना एकही चौकार मारता आला नाही, पण त्यानंतर मात्र अजिंक्यने तीन षटकांमध्ये तीन चौकार मारत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली. उमर गुलच्या पहिल्याच षटकात रहाणेने चौकार आणि गंभीरने अफलातून षटकार ठोकत १३ धावांची कमाई केली. अजिंक्य आणि गंभीर दोघांनीही हळूहळू वैयक्तिक अर्धशतकांच्या दिशेने कूच केली. पाकिस्तानच्या गोलंदाजांवर कुरघोडी करत भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मोठा फटका मारण्याच्या नादात अजिंक्य आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन बाद झाला. बाद होण्यापूर्वी रहाणेने ३१ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४२ धावांची खेळी साकारली. अजिंक्य बाद झाल्यावर काही वेळातच गंभीरने धावचीत होऊन आत्मघात केला. बाद होण्यापूर्वी गंभीरने २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावा केल्या.
गंभीर बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या युवराज सिंगने (१०) पहिल्याच चेंडूवर गगनभेदी षटकार ठोकत धडाक्यात सुरुवात केली खरी, पण त्याला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. अजिंक्य आणि गंभीर या दोन्ही सलामीवीरांनी ७७ धावांची सलामी दिल्यानंतर अन्य फलंदाजांना धावसंख्या फुगवण्यात अपयश आले. सलामीवीर बाद झाल्यावर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत भारताच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. भारताची धावसंख्या ९० असताना गंभीर तेराव्या षटकात बाद झाला, पण त्यानंतर मात्र भारताच्या फलंदाजांना फक्त ४३ धावाच करता आल्या आणि भारताला २० षटकांत ९ बाद १३३ अशी मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
भारत: २० षटकांत ९ बाद १३३
(गौतम गंभीर ४३, अजिंक्य रहाणे ४२, उमर गुल ३/२१, सईद अजमल २/२५) पराभूत वि. पाकिस्तान : १९.४ षटकांत ५ बाद १३४ (मोहम्मद हफिझ ६१, शोएब मलिक नाबाद ५७; भुवनेश्वर कुमार ३/९) सामनावीर : मोहम्मद हफिझ.
रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानच सरस
भेदक गोलंदाजी आणि तीन बिनीचे फलंदाज स्वस्तात गमावल्यावर कर्णधार मोहम्मद हफिझ व शोएब मलिक यांनी फटकावलेल्या झुंजार अर्धशतकांच्या जोरावर रोमहर्षक सामन्यात भारतापेक्षा पाकिस्तानचा संघ सरस ठरला. भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करूनही अन्य फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे नतमस्तक झाल्याने संघाला १३३ धावांवर समाधान मानावे लागले.
First published on: 26-12-2012 at 04:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In intresting match at last pakistan wins