सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्यांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अनेकवेळा ते ट्विटच्या माध्यमातून आपले विचार खुलेपणाने मांडतात. अनेकवेळा त्यामुळे वादाचेही प्रसंग निर्माण झाले आहेत. आता एका ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी आयपीएलवर आपले मत मांडले आहे. आयपीएलच्या लिलावात महिला क्रिकेटपटूंचा समावेश का नाही ? असा सवाल उपस्थित करत लिंगभेद नसावा, अंतिम ११ खेळाडूंत सर्व देशातील मिश्र खेळाडू असले पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

आयपीएलच्या ११ व्या हंगामासाठी शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस लिलाव प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना कोणी खरेदीच केले नाही. तर अनेक नवोदितांना कोट्यवधींची लॉटरी लागल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर ऋषी कपूर यांनी आपल्या यापूर्वीच्या ट्विट करण्याच्या पद्धतीनुसार नवा विचार मांडून चर्चेला सुरूवात केली आहे.

आयपीएल एक विचार आहे. लिलावात महिला क्रिकेटपटू का नाहीत. लिंगभेद केला जाऊ नये. अंतिम ११ मध्ये क्रिकेट खेळणाऱ्या देशातील संमिश्र खेळाडू हवेत, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी पद्मावत चित्रपटाला करणी सेनेकडून होत असलेल्या विरोधावर ट्विट केले होते. जर करणी सेनेने पद्मावत चित्रपट रिलीज करण्यापासून रोखला तर ते जोहर करतील, अशा आशयाचे विनोदी ट्विट केले होते. त्यांनी या ट्विटबरोबर रणवीर आणि करण जोहर यांचे छायाचित्र जोडले होते. नंतर ऋषी कपूरने हे ट्विट डिलीट केले होते. पण तोपर्यंत हे ट्विट खूप व्हायरल झाले होते. या ट्विटचे स्क्रीन शॉट आता व्हायरल झाले आहे.